व्ही. शांताराम दिग्दर्शित, डॉ. श्रीराम लागू, संध्या, वत्सला देशमुख, निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि ‘आली ठुमकत नार’, ‘दे रे कान्हा चोळी आणि लुगडी’, ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘मला इष्काची इंगळी डसली’ आदी लोकप्रिय गाण्यांनी अजरामर झालेल्या ‘पिंजरा’ या चित्रपटावर नुकतीच काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
येत्या १८ मार्च रोजी हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुरुषोत्तम लढ्ढा व चंद्रसेना पाटील यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने व्ही. शांताराम प्रॉडक्शनकडून किरण शांताराम यांच्या सहकार्याने चित्रपटाच्या वितरणाचे हक्क घेतले. प्रसाद लॅबमध्ये चित्रपटाच्या मूळ प्रिंटवर तांत्रिक प्रक्रिया करण्यात येऊन त्या प्रिंटचे २ के स्कॅनिंग करून नवी अद्ययावत प्रिंट तयार करण्यात आली आहे. हॅण्ड क्लीनिंग, अल्ट्रासॉनिक क्लीनिंग, ऑडिओ ग्रॅम्बिंग, कलर ग्रेडिंग आदी तांत्रिक प्रक्रिया करण्यात येऊन आधुनिकतेचा साज चढविण्यात आला आहे. चित्रपटातील जगदीश खेबूडकर यांची गाणी आणि राम कदम यांच्या संगीताची जादू आजही कायम आहे. गाण्यांच्या मूळ चालींना संगीतकार अविनाश-विश्वजीत यांनी आधुनिक पाश्र्वसंगीताची जोड दिली आहे. मूळ अभिजात कलाकृतीला धक्का न लावता हा ‘पिंजरा’ पुन्हा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे.