प्रेमाला कुठलंही बंधन नसतं. अशा बंधमुक्त प्रेमाचं रांजण १७ फेब्रुवारीला भरणार आहे. श्री महागणपती एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये ‘रांजण’ विषयी मोठी उत्सुकता आहे.

चित्रपटसृष्टीत प्रेमकथा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मांडण्यात आल्या आहेत. काळ कुठलाही असला, तरी प्रेक्षकांकडून प्रेमकथांना नेहमीच पसंती मिळालेली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडे अनेक प्रेमकथा आल्या, या सर्वांपेक्षा रांजण वेगळा ठरणार आहे. ‘रांजण’मध्ये एक शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमाची कथा आहे. मात्र, ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडते, मुलभूत गोष्टींवर भाष्य करते. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यातून व्यक्त होतो. प्रेम कथेवर आधारित या सिनेमात दोन नवीन चेहरे दिसणार आहेत. दोन नवीन चेहरे असले तरी एक ताकदीचा कलाकारही या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ते म्हणजे विद्याधर जोशी. या सिनेमातून ते पुन्हा एकदा खलनायिकाची भूमिका साकारणार आहे. विद्याधर जोशी यांच्यासोबतच विनोदाचे हुकमी एक्के भाऊ कदम आणि गणेश भारतपुरेदेखील या सिनेमात दिसणार आहेत. असे हे मराठी सिनेसृष्टीतले तगडे अभिनेते रांजण या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना या खलनायकासोबत विनोदाचे बादशाह असणारे भाऊ कदम आणि भारत गणेशपुरेदेखील दिसणार आहे. हे दोन्ही विनोदी कलाकार पुन्हा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसविण्यास सज्ज झाले आहे. असे हे मराठी चित्रपटसृष्टीचे तगडे तीन कलाकार प्रेक्षकांना रांजण सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

रांजण सिनेमात यश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी त्यांच्याह पुष्कर लोणारकर, अनिल नगरकर, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटातील ‘लागीर झालं रं’ आणि इतरही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन आणि नरेंद्र भिडे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातील गाणी अजय गोगावले, अवधूत गुप्ते, नंदेश उमप, आदर्श शिंदे व दीपाली जोग यांनी गायली आहेत. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी रांजण या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.