मराठी आणि हिंदी सीनेसृष्टीत, मालिकांद्वारे तसेच रंगमंचावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अबाधित स्थान निर्माण केलेल्या अष्टपैलू अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा येत आहेत. “चार दिवस सासू” चे या मालिकेमुळे त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आणि सगळ्यांच्या लाडक्या झाल्या. आता तब्बल ३ वर्षांनंतर त्या पुन्हा कलर्स मराठीवरील “सख्या रे” या नवीन मालिकाद्वारे परत येत आहेत. या मालिकेमध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. रोहिणी यांच्यासोबत या मालिकेत तुमचा लाडका अभिनेता सुयश टिळक तुमच्या पुन्हा भेटीला येणार आहे. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकार या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
“सख्या रे” या मालिकेमध्ये रोहिणी या राजघराण्यातील माँ साहेबांची भूमिका साकारणार आहेत. नावावरूनच व्यक्तिरेखा भारदस्त असणार असल्याचे समजून येते. नक्कीच त्यांच्या अभिनयाच्या साथीने ही भूमिका अजूनच वजनदार होईल यात शंका नाही. प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून रोहिणी हट्टंगडी यांना छोट्या पडद्यावर बघण्याची जी हुरहूर होती ती आता लवकरच क्षमणार आहे. कलर्स मराठीवर “सख्या रे” ही मालिका लवकरच सुरु होणार असून या मालिकेतील रोहिणीजींची भूमिका आणि त्यांचे नवे रूप नक्कीच प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही.
दरम्यान, याआधी सुयश टिळक हा ‘का रे दुरावा’ या मालिकेत झळकला होता. काही दिवसांपूर्वी ‘का रे दुरावा’ या मालिकेतील सुयश टिळक (जय) व सुरुची आडारकर (आदिती) यांचे ‘स्ट्रॉबेरी’ हे नाटकही रंगभूमीवर दाखल झाले आहे. या यादीत आता प्राजक्ता माळी हिची भर पडली आहे. प्राजक्ता माळी आणि सौरभ गोखले यांचे ‘प्लेझंट सरप्राइज’ हे नवे नाटक रंगभूमीवर दाखल झाले आहे. दिवंगत सुधीर भट यांच्या पश्चात ‘सुयोग’ नाटय़संस्थेचे हे नवीन नाटक दीर्घ कालावधीनंतर रंगमंचावर आले आहे. सुधीर भट यांचे सुपुत्र संदेश यांनी आता ‘सुयोग’ची धुरा सांभाळली आहे. आजच्या तरुणाईला आवडेल अशी ‘प्रेमकथा’ त्यांनी नाटकातून सादर केली आहे.