‘सुबक’ने नेहमीच प्रेक्षकांच्या अभिरुचीचा विचार करत अनेक चांगल्या नाट्यकृती रसिकांना दिल्या आहेत. सुबकच्या सहकार्याने रंगभूमीवर दाखल झालेल्या कलाकारखाना प्रस्तुत ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाट्यकृतीने रसिकांची मने जिंकली आहेत. मनोरंजनाची फूल ऑन मेजवानी घेऊन आलेल्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग २८ मेला यशवंत नाट्य मंदिरात रंगणार आहे. या  नाटकाने यंदा महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा तसेच विविध पुरस्कारांवरही आपली ठसठशीत मोहोर उमटवली आहे.

तरूणाईची अचूक नस ओळखणाऱ्या दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी व लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांनी तरुणाईचा सुरेख कॅलिडोस्कोप या नाटकात मांडला आहे. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, सिद्धेश पुरकर, पूजा ठोंबरे हे कलाकार या नाटकामध्ये भूमिका साकारत आहेत. नाटकाच्या प्रसिद्धीपासून ते प्रयोगापर्यंत सर्वच बाबतीत आपले वेगळेपण जपणाऱ्या या नाटकाच्या यशात अभिनेता सुनील बर्वे यांचा मोलाचा वाटा आहे. अल्पावधीतच शंभरी गाठणाऱ्या या नाटकाचे सर्वत्र दमदार प्रयोग होत आहेत.

कालयंत्राद्वारे मागे जाता आलं तर जगाचा इतिहास घडवणाऱ्या किंवा बिघडवणाऱ्या व्यक्तींना वेळीच रोखता येईल. आणि मग त्यांच्या करणीतून घडणारा/ बिघडणारा इतिहासही कोणतीच अनुचित घटना न घडता कळाहीन बनेल.. कालयंत्र (‘टाइम मशिन’) या संकल्पनेत असं बरंच काही घडू शकतं. अशा अनेकानेक शक्यता ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या संकल्पनेच्या गर्भात अंतर्भूत आहेत.

amar-photo-studio-1