‘रईस’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याची किंग खानची तयारी असल्याचे दिसत आहे. म्हणूनच की काय ‘रईस’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतरही शाहरुखने सिनेमाचे प्रमोशन काही थांबवले नाही. सुरुवातीला त्याने ट्रेनमधून प्रवास करत ‘रईस’चे वेगळे प्रमोशन केले आणि आता तो चक्क पुण्यात एका अनोख्या पद्धतीने प्रमोशन करताना दिसत आहे. पुण्यातील एका कॉलेजमध्ये त्याच्या चाहत्यांसोबत तो ‘जालिमा’ या गाण्यावर थिरकताना दिसला.
The students of Symbiosis institute of Design, Pune put on a great show for Raees. Here's a video of them performing Zaalima with @iamsrk pic.twitter.com/MskxXwpYtC
— Excel Entertainment (@excelmovies) January 30, 2017
एक्सेल एण्टरटेनमेन्ट या प्रोडक्शन हाऊसने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पुण्यातल्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये तो ‘रईस’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेला होता. यावेळी त्याने ‘ओ जालिमा’ या त्याच्या आवडत्या गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले. आता शाहरुख नाचतोय म्हटल्यावर तिथल्या विद्यार्थ्यांनाही नाचायला हुरुप येणार हे काही नव्याने सांगायला नको. शाहरुखने त्याचे हात उंचावून त्याची सिग्नेचर पोझ केली तेव्हा तरुणाईचा जल्लोष आणखीनच वाढला.
शाहरुखने यावेळी त्याचे ‘रईस’मधील प्रसिद्ध संवादही बोलून दाखवले. शाहरुखने त्याच्या चाहत्यांसोबत यावेळी ‘शेरों का जमाना होता है..’आणि ‘अम्मीजान केहती थी, कोई धंदा छोटा नहीं होता और धंदे से बडा कोई धर्म नही होता..’ हे तरुणाईचे आवडते संवाद त्यांच्यासोबत बोलताना शाहरुखनेही तेवढीच मजा केली असणार. ‘रईस’ सिनेमातील संवादांशिवाय ‘डॉन’, ‘जब तक है जान’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ यांसारख्या सिनेमातले त्याचे प्रसिद्ध संवाद बोलून दाखवले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाहरुखला त्याचे तयार केलेले पोस्टर आणि ‘रईस’ सिनेमातील त्याच्या लूकची स्क्रॅपबुक भेट म्हणून दिली. एका विद्यार्थीनीने ‘रईस’मध्ये शाहरुखने घातलेल्या पठाणी ड्रेससारखाच एक ड्रेस परिधान केला होता. ‘रईस’ सिनेमात शाहरुखसोबत नवाझुद्दीन सिद्दीकी, माहिरा खान आणि मोहम्मद झिशान आयुब यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.