‘देवा’ सिनेमासाठी लाभला श्रेयाचा आवाज
अंकुश चौधरीच्या अतरंगी लूक मुळे ‘देवा’ या सिनेमाची सध्या भरपूर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे ह्या चर्चेला आता नवीन विषय मिळालाय. आणि तो म्हणजे या सिनेमाचा संगीतकार अमितराज याचं गाणं! संगीताचा जादुगार असलेल्या अमितराजच्या या गाण्याला चक्क श्रेया घोशालचा आवाज लाभला आहे. श्रेया घोशालच्या आवाजातील हे गाणे ‘देवा’ या सिनेमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या गाण्याचे नुकतेच रेकोर्डिंग करण्यात आले.
प्रत्येक संगीतकाराचे आपल्या आवडत्या गायकांसोबत काम करण्याचे स्वप्न असते. अमितराज देखील त्याला अपवाद नाही. मात्र देवाच्या निमित्ताने त्याला त्याची आवडती गायिका श्रेया घोशाल सोबत काम करण्याची संधी मिळाली. ह्या गाण्याला क्षितीज पटवर्धन ह्याचे गीत लाभले आहे. आता ह्या भन्नाट तिगडी कडून आपल्याला नक्कीच काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही. इनोव्हेटिव्ह फिल्मस आणि प्रमोद फिल्मस् यांची संयुक्त निर्मिती असलेला हा सिनेमा नवीन वर्षी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणार आहे. कोकणात चित्रीकरण झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन दक्षिणेतील सुप्रसिध्द दिग्दर्शक मुरली नलप्पा यांनी केले आहे. श्रेयाच्या आवाजातील हे गाणे ‘देवा’ या सिनेमाच्या प्रसिद्धीला चारचाँद लावणारे ठरेल यात शंका नाही.
दरम्यान, प्रत्येक सिनेमातून आपले वेगळेपण जपणारा मराठीचा ‘स्टाईल आयकॉन’ अंकुश चौधरी लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. आतापर्यंत त्याने केलेल्या सिनेमातील विविध व्यक्तिरेखांमध्ये फिट आणि फाईन बसलेला अंकुश त्याच्या आगामी ‘देवा’ या सिनेमातून झळकणार आहे. या सिनेमात तो एका अतरंगी लूकमध्ये दिसेल. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील त्याचा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा अट्टहास बाळगणाऱ्या अंकुशच्या या न्यू लुकला नेटीजन्सचा चांगला प्रतिसाद मिळला होता. रंगीत सदरा, फॅन्सी लॉकेट, हातात माळ, इयर रिंग्स आणि केसांची नवी स्टाईल यामुळे या सिनेमातली त्याची भूमिका नेमकी कशी असणार याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अर्थात अंकुशचा हा अतरंगी लुक त्याच्या चाहत्यांना भुरळ पाडणाराच आहे यात काहीच शंका नाही.