मल्टिस्टारर सिनेमात काम करणं जोखमीचं असतं. त्यात आपल्या भूमिकेला किती महत्त्व मिळेल, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळं ते चित्रपट करण्यास नकार देतात. कदाचित हेच प्रश्न किंवा हीच भीती विनोद खन्ना यांना वाटली नसावी. म्हणून ते मल्टीस्टारर चित्रपटात बिनधास्तपणे काम करत होते. त्यांनी बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन, राजेश खन्ना आणि सुनील दत्त यांसारख्या तगड्या कलाकारांसोबत अनेक चित्रपटांत काम केलं. अमिताभ आणि विनोद खन्ना यांच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.

‘हेराफेरी’, ‘खून पसीना’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ या सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. एकेकाळी अमिताभ आणि विनोद खन्ना यांच्यातला बॉलिवूडचा शहेनशहा कोण? याचीच चर्चा या चंदेरी दुनियेत अधिक रंगली होती. अमिताभ, विनोद खन्ना यांच्यापैकी ‘हिरो नंबर १’ कोण? याची जणू शर्यतच लागली होती. पण त्याचदरम्यान आख्ख्या बॉलिवूडला हादरवणारा निर्णय विनोद खन्ना यांनी घेतला. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या चाहत्यांच्या ‘हिरो’नं सिनेसृष्टीला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अचानक हा निर्णय घेतल्यानं इंडस्ट्रीत जणू भूकंपच आला होता. विनोद खन्ना सिनेसृष्टीला अलविदा करून ते आध्यात्मिक गुरू रजनीश (ओशो) यांच्याकडे निघून गेले. विनोद अनेकदा ओशो यांच्या पुण्यातील आश्रमात जायचे. एवढंच नाही तर त्यांनी आपले शुटिंगचे वेळापत्रकही पुण्यातच ठेवले होते.

vinod-amitabh

१९७५ मध्ये विनोद यांनी जेव्हा सिनेमांमधून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. यानंतर विनोद अमेरिकेत निघून गेले आणि ओशोंसोबत पाच वर्षे राहिले. ओशोंच्या आश्रमात या सुपरस्टारने भांडी घासण्यापासून ते माळीपर्यंतची सगळी कामं केली. ओशोंची शिष्यवृत्ती स्वीकारल्यानंतर खन्ना यांनी त्यांचे अनेक महागडे कपडे, बूट आणि अन्य महागड्या गोष्टी दान केल्या. खन्ना यांना नंतर वैवाहिक जीवनातही स्वारस्य वाटत नव्हते. त्यांच्या या निर्णयामुळे कौटुंबिक कलहात वाढ होत गेली. गीतांजली यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. गीतांजली आणि विनोद यांना अक्षय आणि राहूल ही दोन मुलं आहेत. काही वर्षांनंतर विनोद खन्ना यांनी ओशोंचे आश्रम सोडले आणि घरी परतले. पण विनोद खन्ना यांनी त्यावेळी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला नसता तर, आज ते बॉलिवूडचे शहेनशहा असते. अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही मोठे स्टार असते, असे बोलले जाते.