‘जो खाये वह भी पचताये, जो नही खाये वह भी पचताए’, अशी एक म्हण हिंदीत आहे. भारतीय विवाह संस्थेबदद्ल सर्वांनाच नेहमी एक वेगळे आकर्षण लागून राहिले आहे. त्यातही आपल्या लग्नापेक्षा लोकांना इतरांच्याच लग्नाबदद्ल जास्त उत्सुकता असते. हा प्रयोग हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच यशस्वी होताना दिसला आहे. सूरज बडजात्या यांनी ‘हम आपके है कौन’द्वारे त्याला वेगळे परिमाण मिळवून दिले तर मराठीमध्ये ‘माहेरची साडी’ने अलका कुबल यांना घराघरात पोहचवले. परंतू मध्यंतरी पांचट विनोदी बाजांच्या कात्रीत अडकलेला मराठी चित्रपट पुन्हा एकदा ‘लग्नाच्या’ हुकमी एक्क्याकडे वळताना दिसत आहे. फक्त मोठ्याच नव्हे तर छोट्या पडद्यावरही लग्नाच्या गोष्टी प्रेषकांच्या पसंतीस उतरत आहेत. नुकताच येऊन गेलेला ‘टाईम प्लीज – गोष्ट लग्नानंतरची’, ‘लग्न पहावे करून’ या चित्रपटांनंतर आता ‘मंगलाष्टक – वन्स मोअर’ आणि ‘धामधूम’ हे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
अलिकडच्या काळात प्रेमाची गोष्ट, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, अजब लग्नाची गजब गोष्ट, नवरा माझा नवसाचा यांसारख्या काही चित्रपटांमधूनही लग्नाची वेगळी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विवाहसंस्थेचे महत्व, लिव्ह इन रिलेशनशीप, घटस्फोट या गोष्टी आता मराठीमध्ये नवीन राहिलेल्या नाहीत. विशेष म्हणजे नेहमीच्या पॉप्युलर पध्दतीने विषयाची मांडणी न करता, थोड्या वेगळ्या पध्दतीने आणि प्रस्थापित कलाकारांना घेऊन त्याचे सादरीकरण केल्याने प्रेषकांचीही हे सिनेमे पहायला चित्रपटगृहात गर्दी होत आहे. मोठ्या पडद्यावर एवढा धुमधडाका होत असताना, लहान पडद्यावर त्याचे प्रतिबिंब उमटले नाही तर नवलच. छोट्या पडद्यावरही ‘होणार मी सून या घरची’ पासून ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ पर्यंत सगळीकडे लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.
‘लग्नाची’ हुकमी गोष्ट
मध्यंतरी पांचट विनोदी बाजांच्या कात्रीत अडकलेला मराठी चित्रपट पुन्हा एकदा 'लग्नाच्या' हुकमी एक्क्याकडे वळताना दिसत आहे.
आणखी वाचा
First published on: 17-10-2013 at 01:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding popular formula for films