नुकताच झी गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात दिमाखदार पद्धतीने पार पडला. आपल्या हळव्या प्रेमकथेने आणि झिंगाट गाण्यांनी सर्वांनाच वेड लावणा-या ‘सैराट’ चित्रपटाची जादू याही पुरस्कार सोहळ्यावर बघायला मिळाली. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासहित आठ पुरस्कारांवर ‘सैराट’ने आपलं नाव कोरलं. डोळे दीपवून टाकणारा रंगमंच, त्यावर सादर होणारे रंगतदार नृत्याविष्कार आणि प्रेक्षकांमधून वाहणारा सळसळता उत्साह अशा वातावरणात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याचं आकर्षण ठरला तो जीवनगौरव पुरस्कार. आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने आणि सालस अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी रसिकांचीही मने जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना सीमाताईंसह उपस्थित प्रेक्षकही भारावून गेले होते.

झी चित्र गौरव पुरस्काराची प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीतील सर्वच मंडळी आतुरतेने वाट बघत असतात. या सोहळ्यात कोण बाजी मारतो याकडेही अनेकांचे लक्ष लागलेले असते. यंदा ‘हाफ तिकीट’, ‘कासव’, ‘नदी वाहते’, ‘उबुंटू’, ‘वाय झेड’, ‘जाऊंद्याना बाळासाहेब’, ‘सैराट’ यांसह अनेक चित्रपटांना विविध विभागांत नामांकने मिळाली होती. यामध्ये ‘सैराट’ने सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हे पुरस्कार पटकाविले. याशिवाय इम्पेरिअल ब्लु पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट पदार्पण हा पुरस्कार अभिनेता आकाश ठोसरने तर गार्नियर ब्लॅक नॅचरल परफॉरमन्स ऑफ द इयर हा पुरस्कार अभिनेत्री रिंकु राजगुरुने मिळविला. यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारांमध्ये आकाश ठोसर (सैराट), गिरीश कुलकर्णी (जाऊंद्याना बाळासाहेब) आणि मकरंद अनासपुरे(रंगा पतंगा) यांच्यामध्ये चुरस रंगली आणि यात बाजी मारली ती गिरीश कुलकर्णी यांनी. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी रिंकू राजगुरु (सैराट), पर्ण पेठे (फोटोकॉपी) आणि इरावती हर्षे (कासव) यांच्यामध्ये बाजी मारली ती इरावती हर्षेने.

Pavitra Puniya on Mamta Kulkarni being expelled from Kinnar Akhara
प्रसिद्ध अभिनेत्रीची किन्नर आखाड्यातून ममता कुलकर्णीची हकालपट्टी झाल्यावर प्रतिक्रिया, म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
when mamta kulkarni had fight with ameesha patel
“स्टार कोण? तू की मी?” ममता कुलकर्णीने भर पार्टीत केलेली शिवीगाळ, मध्यस्थी करणाऱ्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीला…
nikki tamboli and usha nadkarni will visit maharashtrachi hasya jatra
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पोहोचल्या निक्की तांबोळी अन् उषा नाडकर्णी! कोकणातील पारंपरिक गाण्यावर धरला ठेका, पाहा प्रोमो
mamta kulkarni took sanyas
२५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी पोहोचली महाकुंभमध्ये, अभिनेत्री होणार ‘या’ आखाड्याची महामंडलेश्वर
man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar engagement
‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘दुर्गा’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
riya sen ashmit patel leaked MMS controversy
दिग्गज अभिनेत्रीची नात, एका गाण्याने बनली स्टार; सलग १२ फ्लॉप चित्रपट, MMS लीक झाला अन्…

या सोहळ्याला चार चांद लावले ते रंगतदार नृत्याविष्काराने. प्राजक्ता माळी, श्रुती मराठे, वैभव तत्त्ववादी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, वैदेही परशुरामी, रसिका सुनील या कलाकारांच्या देखण्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली. यातही सर्वांची दाद मिळवून गेला तो अभिनय बेर्डेचा परफॉर्मन्स. आपले वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्याच गाण्यांतून अभिनयने आदरांजली दिली आणि त्याची साथ दिली ती लक्ष्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रींनी म्हणजेच किशोरी शहाणे, वर्षा उसगावकर, किशोरी अंबिये आणि निवेदिता सराफ. याशिवाय ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही रंगमंचावर येत अभिनयच्या सोबतीने आपल्या नृत्याची झलक दाखवली.

या रंगतदार सोहळ्याचं खुमासदार सूत्रसंचालन प्रियदर्शन जाधव आणि सुमीत राघवन यांनी केलं. एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या रंगात रंगवून टाकणारा असा हा भव्य दिव्य सोहळा येत्या २६ मार्चला तुम्हाला पाहायला मिळेल.

झी चित्रगौरव पुरस्कार २०१७ विजेते
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- सचिन लोवळेकर (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा- विद्याधर भट्टे (एक अलबेला)
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन- वासू पाटील (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- राहूल – संजीव (‘ओ काका’ – वाय झेड)
उत्कृष्ट संकलन- मोहित टाकळकर  (कासव)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – संजय मेमाणे (हाफ तिकीट), धनंजय कुलकर्णी (कासव)
सर्वोत्कृष्ट ध्वनिरेखाटन- अनमोल भावे (उबुंटू)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- अजय-अतुल (सैराट)
सर्वोत्कृष्ट गीतकार- समीर सामंत (‘माणसाने माणसाशी’ – उबुंटू)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- श्रेया घोषाल (आताच बया का बावरलं- सैराट)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले  (याड लागलं – सैराट)
सर्वोत्कृष्ट संगीत- अजय-अतुल (सैराट)
सर्वोत्कृष्ट कथा- राजन खान (हलाल)
सर्वोत्कृष्ट पटकथा- गिरीश जोशी (टेक केअर गुडनाइट)\
सर्वोत्कृष्ट संवाद- सुमित्रा भावे (कासव)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- प्रियांका बोस कामत (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- प्रियदर्शन जाधव (हलाल)
गार्नियर नॅचरल प्रस्तुत मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर – रिंकू राजगुरु (सैराट)
इम्पेरिअल ब्लु पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट पदार्पण- आकाश ठोसर (सैराट)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- शुभम मोरे, विनायक पोतदार (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- इरावती हर्षे (कासव)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- गिरीश कुलकर्णी (जाऊंद्याना बाळासाहेब)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- नागराज मंजुळे (सैराट)
सर्वोत्कृष्ट चित्रपट- (सैराट)
विशेष लक्षवेधी चित्रपट – नदी वाहते

Story img Loader