Raid 2 Box Office Collection Day 1: अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रेड 2’ गुरुवारी १ मे रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती, ज्यामुळे त्याचे अॅडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले होते. सिनेमागृहांमध्ये ‘रेड २’ ला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ‘रेड २’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती किती कलेक्शन केले, ते जाणून घेऊयात.

‘रेड 2’ हा २०१८ मधील सुपरहिट चित्रपट ‘रेड’चा सिक्वेल आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांना टक्कर देत जबरदस्त कमाई केली आहे. गुरुवारी संजय दत्तचा ‘द भूतनी’, दाक्षिणात्य चित्रपट ‘रेट्रो’ व ‘हिट ३’ आणि हॉलीवूडचा ‘थंडरबोल्ट’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. तसेच आधी प्रदर्शित झालेले ‘केसरी २’ आणि ‘जाट’ दोन्हीही थिएटर्समध्ये आहेत. या सर्व चित्रपटांना टक्कर देत ‘रेड 2’ बॉक्स ऑफिसवर बाजी मारण्यात यशस्वी झाला.

‘रेड 2’ ने दमदार ओपनिंग केली आहे. चित्रपटाने प्री-तिकीट सेलमध्ये सुमारे १० कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. या चित्रपटाची सुरुवात खूपच दमदार झाली आहे.

‘रेड 2’ चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘रेड 2’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी १८.२५ कोटी रुपये कमावले आहेत. ही प्राथमिक आकडेवारी आहे, अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतर त्यात बदल होऊ शकतात.

वर्षातील तिसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट

‘रेड २’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘रेड २’ हा चित्रपट २०२५ मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. ‘छावा’ (३३.१० कोटी) आणि ‘सिकंदर’ (२७.५० कोटी) ‘रेड २’ (१८.२५ कोटी) हे यंदाचे सर्वाधिक ओपनिंग करणारे तीन बॉलीवूड चित्रपट आहेत.

‘रेड २’ ने पहिल्याच दिवशी वसूल केले निम्मे बजेट

‘रेड २’ हा ४० ते ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला चित्रपट आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी १८.२५ कोटी रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे, चित्रपटाने जवळजवळ निम्मे बजेट वसूल केले आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता तो या वीकेंडला पूर्ण बजेट वसूल करेल आणि हिट ठरेल.

रजत गुप्ता दिग्दर्शित, रेड 2 मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.