यंदाच्या अर्थसंकल्पात १९ कोटींची तरतूद; विक्रोळी, कळवा, ठाकुर्ली उड्डाणपूल मार्गी लागणार
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे वाहतूक प्रवाशांसाठी अत्यंत सुरक्षित बनवण्याची घोषणा केली असून त्यासाठी रेल्वेमार्गावरील रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तब्बल २७ फाटक बंद होण्याचा मार्ग मोकळा झाला असून येथे उड्डाणपूल उभे राहणार आहेत. त्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात साधारण १९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मुंबई उपनगरीय विभागात दर वर्षी तब्बल साडेतीन हजार प्रवासी रेल्वे अपघातांत मृत्युमुखी पडतात. त्यापैकी बहुतांश मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना होतात. मुंबई विभागात काही ठिकाणी अद्यापही रेल्वे फाटक असून तेथे लोक जीव धोक्यात टाकून रूळ ओलांडतात. हा धोका टाळण्यासाठी अशी रेल्वे फाटक बंद करून तेथे उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे यापैकी काही फाटकांमुळे रेल्वेच्या वक्तशीरपणावरही परिणाम होतो. मध्य रेल्वेमार्गावर कळवा-मुंब्रा, ठाकुर्ली स्थानकाजवळ आणि दिवा स्थानकाजवळ अशा तीन ठिकाणी असलेल्या रेल्वे फाटकांचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसतो. तसेच येथे अनेकदा अपघात होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. यापैकी दिवा येथील फाटक वगळता उर्वरित दोन रेल्वे फाटके बंद करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण साडेचार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी तीन कोटी रुपये ठाकुर्ली येथील रेल्वे फाटक बंद करून उड्डाणपूल बांधण्यासाठी आणि दीड कोटी रुपये कळव्याजवळील रेल्वे फाटक बंद करून उड्डाणपूल बांधण्यासाठी देण्यात आले आहेत.
त्याशिवाय विक्रोळी स्थानक, दिवा-वसई मार्ग (६ रेल्वे फाटक), दिवा-रोहा मार्ग (१० रेल्वे फाटक) आदी महत्त्वाच्या ठिकाणी काम होणार आहे. या एकूण २७ फाटक बंद करून तेथे उड्डाणपूल बांधण्यासाठी सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.