राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. मनसेने स्थापनेपासून आतापर्यंत एकही मुद्दा तडीस नेला नसल्याचा थेट आरोप केला. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित तोडपाणी झाली असण्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
पिंपरी चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मनसेवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत व्हावे यासाठी ‘प्रायश्चित’ म्हणून दिग्दर्शक करण जोहर यांनी पाच कोटी रूपये सैन्य कल्याण निधीला देण्यास राज ठाकरे यांनी सांगितले. आणि हा सर्व तोडपाणीचा उद्योग राज्याच्या प्रमुखासमोर होतो हे दुख:द आहे. राज ठाकरेंनी देशाची किंमत पाच कोटी केली काय, असा सवाल उपस्थित केला. या प्रकाराला मराठीत ‘खंडणी’ म्हणतात असे उपरोधिक वक्तव्य करत या संर्पूण प्रकाराचा मला संशय असल्याचे त्यांनी म्हटले. हा पाच कोटींचा निधी स्वीकारण्यास अनेक आजी-माजी सैन्य अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवल्याचे त्यांनी सांगितले.
मनसेने स्थापनेपासून आतापर्यंत कुठलाच मुद्दा तडीस नेलेला नाही. प्रत्येक आंदोलन ते अर्ध्यावर सोडतात. त्यामुळे मला ‘तोडपाणी’चा नेहमी संशय येतो असे सांगत त्यांनी मुंबई-पुणे टोल नाक्यावरील मनसेच्या आंदोलनाचे उदाहरण दिले. मनसेची कुठलीच भूमिका खंबीर नसते. या उलट बाळासाहेब ठाकरे यांनी एखाद्या गोष्टीला विरोध केला तर तो शेवटपर्यंत कायम ठेवत. त्यांनी कधीच, कुठलीही तडजोड केली नाही.

Story img Loader