‘डॅडचा फोन आला होता. ते म्हणाले, मीडियाशी बोलू नकोस..’ चुलतभाऊ आदित्य ठाकरे याच्या पावलावर पाऊल टाकत पालिकेच्या राजकारणात पहिल्यांदाच प्रवेश केलेल्या युव‘राज’ अमित ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली गेली तेव्हा त्यांनी हा असा प्रतिसाद दिला. शहरातील पर्जन्यवृक्षांवर लागलेली कीड हटवण्यासाठी काही झाडांवर जैविक प्रयोग करण्याची परवानगी आयुक्तांकडे मागण्यासाठी ते आले होते. आयुक्तांनी परवानगीसोबत पालिकेकडून आवश्यक ती मदत पुरवण्याचेही आश्वासन दिले.
पर्जन्यवृक्ष वाचवण्यासाठी अमित ठाकरे यांनी आयुक्तांची घेतलेली भेट आणि आयुक्तांचा सकारात्मक दृष्टिकोन याबाबत माहिती देण्यासाठी मनसेचे नेते पुढाकार घेत असले तरी अमित ठाकरे यांनी मात्र या सर्व प्रकरणात मौन बाळगले. पर्जन्यवृक्षांची समस्या सोडवण्यात गेली चार वर्षे पालिकेला अपयश आले आहे. शहरातील हजारो वृक्ष निष्पर्ण होऊन गतप्राण होत असताना पालिकेकडून प्रभावी उपाययोजना झालेली नाही. शिवाजी पार्क परिसरातील वृक्षांचा पर्णसांभारही आता झडू लागला आहे. घराच्या परिसरातील वृक्षांचे मरण तसेच शहरात इतरत्र इंजेक्शन देऊन झाडांची होणारी कत्तल थांबवण्याबाबत अमित ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांसह आयुक्त सीताराम कुंटे यांची सोमवारी दुपारी भेट घेतली.
 मिलीबग या कीटकाच्या संसर्गामुळे पर्जन्यवृक्ष ढासळत असल्याचे मत आहे. झाडांवर असलेल्या मिलीबग या कीटकाला खाण्यासाठी लेडीबग या दुसऱ्या कीटकाला झाडावर सोडण्यात येते. पुणे तसेच बंगळुरू येथील संस्थांमधून हे कीटक आणून काही झाडांवर सोडण्याचा प्रयोग करण्याची परवानगी ठाकरेंच्या युवराजांनी मागितली. या झाडांवर किडे सोडण्यासाठी उंच शिडय़ांचीही आवश्यकता आहे. हे किडे बंगलोरहून मागवल्यावर ते झाडांवर सोडण्यासाठी पालिकेच्या संबंधित विभागाकडून मदत देण्याचे आश्वासन कुंटे यांनी दिल्याचे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलणे टाळले
पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली तेव्हा अमित यांनी डॅड यांचे नाव पुढे करत काही बोलणे टाळले. ‘आयुक्तांना भेटायला डॅडनी मला पाठवले, याचेच मला आश्चर्य वाटत आहे. मीडियाशी बोलू नकोस, असे त्यांनी कॉल करून सांगितले. मी राजकारणात येत असल्याच्या बातम्या नको, असे त्यांना वाटते,’ असे बोलून ज्युनिअर ठाकरे पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच निघून गेले.