‘हॉट की’ यंत्राच्या चाचणीला अखेर सुरुवात
उपनगरीय रेल्वेचे तिकीट एटीव्हीएम यंत्रावरुन काढण्याची प्रक्रिया कीचकट असल्याने प्रवाशांना एका क्लिकवर तिकीट काढता यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी एटीव्हीएम मशीनवर ‘हॉट की’ बसवण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या साध्या एटीव्हीएम यंत्राच्या तुलनेत ही नवीन यंत्रे अधिक सोपी आणि फायदाची ठरणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी सर्वात सोपा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी ‘हॉट की एटीव्हीएम’ यंत्र उपलब्ध करण्याचा पर्याय काही दिवसांपूर्वी चाचपडून पाहिला जात होता. परंतु ‘रेल्वे माहिती प्रणाली केंद्र’(क्रीस) या संस्थेने यात उदासीनता दाखवल्याने ही प्रणाली लालफितीत अडकली होती. मात्र अखेर ‘हॉट की एटीव्हीएम’ यंत्राची चाचणी ‘क्रीस’ संस्थेद्वारे करण्यास सुरुवात झाल्याचे प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ‘हॉट की’ मशीनच्या स्वतंत्र निर्मिती करण्याऐवजी सध्या उपलब्ध असलेल्या एटीव्हीएम मशीनवर हा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. याबाबत ‘क्रीस’कडे रेल्वे प्रशासानाकडून सूचना आल्यानंतर हे बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या मध्य रेल्वेवरील एकूण तिकीट विक्रीपैकी ६५ टक्के विक्री ही तिकीट खिडक्यांवरून होते. तर एटीव्हीएम आणि जेटीबीएस प्रणालीवरून उर्वरित तिकीटे विकली जातात. या यंत्राद्वारे तिकीट काढण्याची प्रक्रिया सर्वसामान्यांनाही सोपी होऊ शकेल. यात प्रवाशांचा वेळही वाचेल. त्यामुळे या यंत्राची चाचणी सुरू केल्याची माहिती ‘रेल्वे माहिती प्रणाली केंद्रा’चे मुंबईचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले. उपनगरीय रेल्वे मार्गावर असलेल्या तिकिटाचे टप्प्यांनुसार पाच,दहा आणि पंधरा या शुल्काची बटणे या एटीव्हीएमवर असतील असे सांगण्यात आले.

हार्बरवर ५ सिमेन्स गाडय़ा
नेहमीच अडगळीत पडलेल्या हार्बर आणि टान्स हार्बर मार्गाला ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. एसी-डीसी परिवर्तन, वातानुकूलित गाडी, बारा डबा आणि आता पाच सिमेन्स गाडय़ा हार्बर मार्गावर धावणार आहे. त्यामुळे हार्बरकरांचा प्रवास येत्या काळात आरामदायी होणार असल्याचा दावा अधिकारी करत आहेत.