एकेकाळी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे भरवशाचे आणि अत्यंत आरामदायक साधन मानल्या जाणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या परिवहन सेवेला उतरती कळा लागली आहे. आता ‘बेस्ट’ने प्रवाशांचा ‘जोगवा’ मागण्याची सुरुवात केली असली, तरी उत्तम सेवेची झोळी फाटकी असल्याने प्रवासी बेस्टकडे पाठ फिरवत आहेत. विशेष म्हणजे प्रशासनातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी बेस्ट प्रशासन दर वेळी सातत्याने कमी होणाऱ्या प्रवासी संख्येचे कारण पुढे करत आहे. याबाबत समिती सदस्यांनीही वारंवार प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.

दोन वर्षांपूर्वीपर्यंत दर दिवशी ४५ लाख एवढी प्रवासी संख्या असलेल्या बेस्टच्या परिवहन विभागाचे प्रवासी भारमान सध्या फक्त ३० लाख एवढे आहे. हे १५ लाख प्रवासी कमी झाल्याने बेस्टला प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे.

मात्र यामागील कारणमीमांसा जाणून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी बेस्ट प्रशासनाने प्रवाशांना भावनिक आवाहन करण्याचा अत्यंत सरधोपट मार्ग स्वीकारला. त्यातच ‘प्रवाशांनी रिक्षा-टॅक्सीऐवजी बेस्टच्या सेवेचा लाभ घ्यावा,’ अशी उद्घोषणा काही महत्त्वाच्या स्थानकांबाहेर कण्र्यावरून करत बेस्टने आपली विपन्नावस्था जाहीर केली आहे.प्रवाशांना ‘बेस्टनेच प्रवास करा’ असे सांगणाऱ्या बेस्टची सेवा मात्र अभूतपूर्व गोंधळात चालत असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. गर्दीच्या वेळी महत्त्वाच्या थांब्यांवरही २०-३० मिनिटे एकेका बससाठी वाट पाहावी लागते. बस भरून आल्यास चालक ती बस मधल्या थांब्यांवर थांबवण्याचीही तसदी घेत नाही. प्रवाशांना उतरायचे असल्यास थांब्याच्या थोडे पुढे नेऊन अथवा मागे थांबवून प्रवाशांना उतरवले जाते. तसेच वाहतूक कोंडीत एकाच मार्गावरील अनेक बसगाडय़ा अडकल्यानंतर त्यांच्या वेळापत्रकात तातडीने बदल करण्याऐवजी एकामागोमाग एक गाडय़ा सोडल्या जातात. परिणामी पहिल्या दोन गाडय़ांनंतरच्या गाडय़ा रिकाम्या जातात, असे प्रवाशांचे म्हणणे आहेबेस्टच्या तोटय़ात वाढ होत असल्याची ओरडही सातत्याने केली जाते. त्यामुळे तिकिटदरात वारंवार वाढ करण्याचे प्रस्ताव बेस्ट प्रशासनाकडून समितीसमोर ठेवले जातात.

 

कारवाई न केल्यास मनसेचा दणका

मनसेचे बेस्ट समिती सदस्य केदार होंबाळकर यांना याबाबत विचारले असता, प्रवाशांचा जोगवा मागण्यापेक्षा बेस्टने आपली फाटकी झोळी शिवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. प्रवाशांना भावनिक आवाहन करण्यापेक्षा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना कामाला लावायला हवे. बेस्ट प्रशासनाने या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांना ‘मनसे’च्या शैलीत दणका देण्यात येईल, असेही ते म्हणाले.याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता पावसाळ्यात पावसामुळे वाहतूक कोंडीत अनेक बसगाडय़ा फसतात. त्यामुळे गाडय़ांचे नियोजन करणे कठीण जात असल्याचे सांगण्यात आले.

 

 

Story img Loader