- नगरपालिका निवडणुकांत कमळ खुलले
- नगरसेवक संख्याबळात काँग्रेस दुसऱ्या स्थानी
- राष्ट्रवादी काँग्रेसला बालेकिल्ल्यांतही धक्का
राज्याची सत्ता ताब्यात असलेल्या पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरशी होण्याची परंपरा कायम राहिली असून, शहरी भागातील मतदारांनी लोकसभा आणि विधानसभेपाठोपाठ या निवडणुकांतही भारतीय जनता पक्षालाच संधी दिली आहे. सर्वाधिक यश मिळवणाऱ्या भाजपचे कमळ या निवडणुकीत खुलले असून, देशात सर्वत्र निस्तेज झालेल्या काँग्रेसला नगरसेवकांचे संख्याबळ पाहता आश्चर्यकारकरीत्या दुसरा क्रमांक मिळाला आहे. शिवसेनेलाही बऱ्यापैकी यश मिळालेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र त्यांच्या बालेकिल्ल्यातही धक्के सहन करावे लागले आहेत.
राज्यातील १४७ नगरपालिका व १७ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारणे अत्यावश्यक ठरले होते. राज्यातील मराठा मोर्चे, तसेच नोटाबंदीनंतर उद्भवलेली परिस्थिती हे दोन मुद्दे फडवणीस यांना अडचणीचे ठरू शकतील, असा अनेकांचा होरा होता. विशेषत नोटाबंदीमुळे त्रस्त झालेले नागरिक मतदान करताना तो त्रागा व्यक्त करतील, अशी विरोधी पक्षांची अटकळ होती. मात्र, भाजपने जुन्या नोटांचा खुबीने वापर करून घेतला. मराठा समाजाच्या मोर्चाची इतर मागासवर्गीय आणि दलित समाजात निर्माण झालेली प्रतिक्रिया भाजपच्या फायदेशीर ठरली. मराठा समाजाच्या मोर्चाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसला असताना भाजपने मात्र त्याचा व्यवस्थित फायदा करून घेतल्याचे स्पष्ट होत आहे. मराठा समाजाच्या मोर्चाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्तपणे घेतलेली भूमिका भाजपला फायदेशीर ठरली, असे बोलले जाते. त्याचवेळी, शहरी भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम असल्याचेही या निकालातून दिसून आले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवातून काँग्रेस अद्यापही सावरलेली नाही. बिहारमध्ये आघाडीत मिळालेल्या विजयाचा अपवाद वगळता साऱ्यांच निवडणुकांमध्ये काँग्रेसची धूळधाण झाली होती. मात्र या निवडणुकीत मिळालेल्या यशाने काँग्रेस पक्ष संपलेला नाही हा संदेश गेला आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या सुमारे १०० नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपच्या तुलनेत बरोबरीने यश मिळविले होते.
नगरपालिका निवडणुकांमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या भाजपच्या खालोखाल काँग्रेसची आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर असला तरी पक्षाने फार काही नियोजन न करतानाही मिळालेले यश महत्त्वाचे आहे.
पक्षाच्या प्रभावशाली नेत्यांनी आपापल्या विभागांमध्ये वर्चस्व कायम राखले आहे. ‘१६४ नगरपालिका निवडणुकीत ५८ लाख मतदार होते. ५८ लाख मतदारांवरून एकूण राजकीय चित्र स्पष्ट होत नाही’, ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया बोलकी आहे.
बाद नोटा भाजपसाठी चलनी!
राज्यभरातील नगरपालिकांच्या निवडणुकीत नोटाबंदी आणि मराठा समाजाचे मोर्चे हे दोन विषय सत्ताधारी भाजपसाठी प्रतिकूल ठरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र नोटाबंदीनंतर पालिकांमध्ये वसुलीकरिता जुन्या नोटा स्वीकारण्यास मुभा देण्याचा निर्णय भाजपच्या पथ्यावरच पडल्याचे दिसत आहे, कारण यामुळे पालिकांच्या तिजोरीत भर टाकण्यास भाजपनेच मदत केली आणि मतदारांना ‘करमुक्त’ करून त्यांना खूश केले. त्याचा साहजिकच फायदा भाजपला झाला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कर भरल्याच्या पावत्या मतदारांना देण्यात आल्या. मतदारांना करमुक्त करण्याची मोहीम फत्ते झाल्याची कबुली भाजपच्या एका नेत्याने खासगीत
दिली.
सेनेशी युती करण्यास भाजपची दारे खुली
भाजपने शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी वापरली नाही व पैशांचाही वापर केला नाही. उलट बिनपैशांची निवडणूक लढल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. ही निवडणूक राज्य सरकारची कामगिरी, नोटा बंदीच्या पाश्र्वभूमीवर होती आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने चांगल्या प्रकारे सोडविला. त्याची प्रचिती आल्याचे दानवे यांनी सांगितले.
दिग्गजांना धक्का
पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, रावसाहेब दानवे, जयंत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह विविध दिग्गज नेत्यांना त्यांच्या प्रभाव क्षेत्रात पराभवाचा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकांसाठी या नेत्यांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जातो.
या निवडणुकीत भाजपच्या जागा गेल्यावेळच्या तुलनेत तिप्पटीने वाढल्या असून निवडणूक झालेल्या जागांपैकी सुमारे एक तृतीयांश जागा भाजपच्या वाटय़ाला आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांवर जनतेने दृढ विश्वास व्यक्त केला आहे.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ता आणि पैशाच्या जोरावर भाजपाने यश मिळविले असले तरी राज्यात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता आम्हाला अधिक काम करावे लागेल
– अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष
राज्याच्या नगरपालिका निवडणुकांमधील भारतीय जनता पक्षाचा विजय हा पाचशे, हजारच्या नोटा बंद केल्याचा विजय नसून जुन्या नोटांचा विजय आहे.
– राज ठाकरे, मनसे प्रमुख