विधानसभा जागावाटपावरून शिवसेना-भाजप महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू असून महायुती अभंग राहणार की काडीमोड होणार याबाबत पालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांमध्ये चर्चा सुरू आहे. जागावाटपाच्या तिढय़ावरून महायुती तुटली तर पालिकेतील सत्ता शिवसेना-भाजपकडे राहणार की तेथेही सवतासुभा निर्माण होणार असा प्रश्न उभय पक्षांच्या नगरसेवकांना पडला आहे.
पालिकेत शिवसेनेचे ७५, भाजपाचे ३१, काँग्रेसचे ५२, राष्ट्रवादीचे १३, मनसेचे २८, समाजवादी पार्टी ९, अखिल भारतीय सेने २, भारिप १, रिपाई १ आणि अपक्ष १५ असे संख्याबळ आहे. यापैकी शिवसेना, भाजप, रिपाई महायुती अखिल भारतीय सेना आणि ११ अपक्ष नगरसेवकांना बरोबर घेऊन सत्तेवर आली. आता जागावाटपाच्या वादात भाजपने साथ सोडल्यास शिवसेनेपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला बहुमतासाठी ११४ नगरसेवकांची गरज भासेल. मात्र पालिकेतील सर्वपक्षीय बलाबल पाहता बहुमताचा हा आकडा गाठणे शिवसेनेसाठी आव्हान ठरेल, अशी कुजबूज नगरसेवकांमध्ये सुरू झाली आहे.