१९२७-२०१६
अर्कचित्र म्हणजे वेडीवाकडी चित्रे नव्हेत. ज्याचे अर्कचित्र काढायचे त्याचे व्यक्तिमत्व त्या चित्रात उमटायला हवे, असा आग्रह धरणारे रेषांचे जादुगार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे (८९) यांचे शुक्रवारी सायंकाळी वृध्दापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी संजीवनी, दोन मुली, एक मुलगा आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. सरवटे यांच्या पार्थिवावर आज, रविवारी सकाळी सात वाजता पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. व्यंगचित्रांतून आपले म्हणणे मांडून न थांबता त्यातला आशय लोकांना समजून घेता यावा यासाठी कार्यरत असणारा वसंत सरवटे यांच्यासारखा दिग्गज व्यंगचित्रक्षेत्रातून हरपल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापुरात जन्मलेल्या वसंत सरवटे यांनी वयाच्या १७व्या वर्षांपासून आपल्या रेषांच्या फटकाऱ्यांनी व्यंगचित्रे काढण्यास सुरुवात केली होती. व्यवसायाने स्थापत्य अभियंते असूनही आपले काम सांभाळून व्यंगचित्रांमध्ये त्यांनी मातब्बरी मिळवली. ते उत्कृष्ट चित्रकारही होते. पु.ल. देशपांडे, िव. दा. करंदीकर, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकांसाठी वसंत सरवटे यांनी सातत्याने मुखपृष्ठ रेखाटली होती. ‘ललित’ मासिकात ‘ठणठणपाळ’ या जयवंत दळवींच्या लेख मालिकेसाठी सरवटेंनी काढलेली चित्रे त्या काळी खूप गाजली होती. ‘माणूस’ या साप्ताहिकाच्या काळातला (१९६९ ते १९७२) त्यांनी काढलेल्या चित्रांचा खजिना ‘रेषालेखक वसंत सरवटे’ या पुस्तकात आहे. लोकांना व्यंगचित्रांमधील आशय समजत नाही. त्यामुळे लोकांमध्ये व्यंगचित्रांविषयी जाण निर्माण व्हावी यासाठी त्यांनी या विषयावर विपुल लेखनही केले होते. ‘संवाद रेषालेखकांशी’, ‘खेळ चालू राहिला पाहिजे’, ‘खेळ रेषावतारी’, ‘सावधान पुढे वळण आहे’, ‘व्यंगचित्र – एक संवाद’, ‘व्यंगकला-चित्रकला’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. नुकताच सरवटे यांना ‘कार्टुनिस्ट कम्बाइन’ या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांच्या संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते स्वत: हा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहू शकले नव्हते. मराठी व्यंगचित्रकारितेचा इतिहास हा वसंत सरवटे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.