वेळखाऊ ‘पीओएस’ यंत्रांमुळे प्रवासी-कर्मचाऱ्यांत शाब्दिक चकमकी

निश्चलनीकरणानंतर प्रवाशांना रोकडरहित व्यवहारांकडे वळवण्यासाठी रेल्वेने आपल्या सर्व तिकीट खिडक्यांवर पीओएस यंत्रे बसवण्याचे आदेश दिले असले, तरी उपनगरीय क्षेत्रात ही पीओएस यंत्रे सध्या प्रवासी व रेल्वे कर्मचारी या दोघांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. उपनगरीय प्रवासाचा पास काढण्यासाठी ही यंत्रे सध्या वापरात असली, तरी रोख व्यवहारांपेक्षा या यंत्रांवरून होणारा व्यवहार जास्त वेळखाऊ आहे. त्यामुळे पासाशिवाय साधी तिकिटे काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना ताटकळावे लागत आहे. तसेच या यंत्रांवरून व्यवहार झाल्यावर दिवसाच्या शेवटी हिशेबाचा ताळेबंद देताना कर्मचाऱ्यांच्याही नाकी नऊ येत आहेत.

देशभरात उसळलेल्या चलनकल्लोळात रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर ५०० आणि १००० रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा खपवण्यासाठी जास्त गर्दी उसळली होती. त्यामुळे रेल्वेला सुटय़ा पैशांची चणचणही भेडसावली होती. त्यातून धडा घेत रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाडय़ांची तिकिटे आरक्षित करण्यासाठी आणि उपनगरीय रेल्वेमार्गावरील मासिक-त्रमासिक आदी पास काढण्यासाठी तिकीट खिडक्यांवर पीओएस यंत्रे बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे २६ डिसेंबरपासून ही यंत्रे बसवून नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ही यंत्रणा सुरू झाल्यापासून म्हणजेच २७ डिसेंबरपासून ते ९ जानेवारीपर्यंत तब्बल ११,१०३ प्रवाशांनी पीओएस यंत्रांद्वारे पास काढले आहेत. त्यापैकी ८१८५ प्रवासी मध्य रेल्वेवर असून २९१८ प्रवासी पश्चिम रेल्वेवरील आहेत, पण सध्या ही यंत्रे प्रवासी व कर्मचारी या दोघांसाठी वेळखाऊ ठरत आहेत.

सर्वच तिकीट खिडक्यांवर ही यंत्रे असल्याने पास काढण्यासाठी वेगळ्या खिडकीवर रांग लावण्याची गरज नसते. परिणामी पास काढणारे प्रवासी नेहमीच्या तिकिटांच्या रांगे उभे राहतात. क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे देताना रोख व्यवहारापेक्षा तीन ते चार मिनिटांचा जास्त अवधी लागतो. अनेकदा नेटवर्कची समस्या जाणवत असल्याने एकदा पैसे वळते करण्यासाठी दोन ते तीन प्रयत्न करावे लागतात. तसेच रेल्वेकडे अद्याप डॉट मॅट्रिक्स या अत्यंत जुन्या प्रणालीवर चालणारे प्रिंटर्स असल्याने पासची छपाई होण्यासही वेळ लागतो. परिणामी मासिक पास काढणाऱ्या प्रवाशाच्या मागे पाच किंवा दहा रुपयांचे तिकीट काढण्यासाठी उभ्या असलेल्या प्रवाशाला जास्त काळ थांबावे लागत आहे. प्रवाशांप्रमाणेच रेल्वेच्या तिकीट बुकिंग कर्मचाऱ्यांनाही या यंत्रांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दर दिवशी किंवा पाळी संपल्यानंतर विकली गेलेली तिकिटे आणि जमा झालेली रक्कम यांचा ताळेबंद या कर्मचाऱ्यांना सादर करावा लागतो. या यंत्रांच्या सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या समस्येमुळे अनेकदा हा ताळेबंद चुकत असल्याने आतापर्यंत सात ते आठ वेळा कर्मचाऱ्यांना आपल्या खिशातून कमी पडत असलेली रक्कम चुकती करावी लागल्याचे एका तिकीट बुकिंग क्लार्कने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.

पीओएस यंत्रे सरसकट सर्व खिडक्यांवर सुरू करण्याऐवजी मासिक पास काढण्यासाठी मोठय़ा स्थानकांमध्ये तीन आणि लहान स्थानकांमध्ये एक किंवा दोन खिडक्यांवर सुरू करायला हवी होती. त्यामुळे पास काढणारे प्रवासी या खिडक्यांवरच एकवटले असते आणि तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसला नसता.

नंदकुमार देशमुख, उपनगरीय प्रवासी एकता महासंघ.

पीओएस यंत्रे सरसकट सर्व खिडक्यांवर सुरू करण्याऐवजी मासिक पास काढण्यासाठी मोठय़ा स्थानकांमध्ये तीन आणि लहान स्थानकांमध्ये एक किंवा दोन खिडक्यांवर सुरू करायला हवी होती. त्यामुळे पास काढणारे प्रवासी या खिडक्यांवरच एकवटले असते आणि तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसला नसता.

नंदकुमार देशमुख, उपनगरीय प्रवासी एकता महासंघ.