‘सुरेश कलमाडी आणि अशोक चव्हाण यांना न्यायालयाने दोषी ठरविलेले नाही, त्यामुळे उमेदवारीसाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे विधान पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण स्वामी यांनी केल्याने काँग्रेसमध्ये कलमाडी यांना पुण्यातून उमेदवारी देण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे अशी स्वत:ची प्रतिमा तयार करणारे राहुल गांधी कोणती भूमिका घेतात यावरच सारे अवलंबून राहणार आहे.
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतील घोटाळाप्रकरणी कलमाडी यांना तुरुंगाची हवा खावी लागली. पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले. पुण्यातून कोणाला उमेदवारी द्यायची याचा विषय येताच पुन्हा एकदा कलमाडी यांचेच नाव पुढे दमटण्यात येत आहे.
कलमाडी उमेदवार असतील तरच पुण्याची जागा निवडून येऊ शकते, असे वातावरण कलमाडी यांच्या समर्थकांनी दिल्लीत तयार केले आहे. कलमाडी यांच्याऐवजी मोहन जोशी, विनायक निम्हण आणि विश्वजित कदम यांच्या नावांची उमेदवारीसाठी चर्चाही सुरू झाली. मात्र नारायण स्वामी यांच्या विधानामुळे कलमाडी यांना उमेदवारी दिली जाणार की काय, अशी शंका कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. पक्षाची सूचना असल्याशिवाय नारायणस्वामी कधीच वादग्रस्त विधाने करणार नाहीत, असे काँग्रेसमध्ये बोलले जाते.
नारायणस्वामी यांनी कलमाडी आणि अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत सूचक उद्गार काढल्याने या दोन्ही नेत्यांना उमेदवारी मिळणार असेच वातावरण तयार झाले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षाच्या पातळीवर गंभीरपणे विचार सुरू आहे. मात्र कलमाडी यांना उमेदवारी दिल्यास चुकीचा संदेश जाईल, असाच काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.
कलमाडींच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली
‘सुरेश कलमाडी आणि अशोक चव्हाण यांना न्यायालयाने दोषी ठरविलेले नाही, त्यामुळे उमेदवारीसाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो,
First published on: 25-02-2014 at 02:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress back kalmadi for lok sabha candidate