पर्यटकांसाठी पालिकेचा निर्णय

छत्रपती शिवाजी टर्मिनस, महापालिका मुख्यालय, जीपीओ आदी पुरातन वास्तूंमुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सीएसटी परिसराचे सौंदर्य न्याहाळता यावे तसेच ते छायाचित्रात सामावता यावे यासाठी दर्शनी चौथरा उभारल्यानंतर येथील पादचारी मार्गावरील छताचेही रुपडे पालटण्याचा पालिकेचा बेत आहे.

पालिका मुख्यालय व छत्रपती शिवाजी टर्मिनस या दोन इमारती आपल्या कॅमेऱ्यात टिपता याव्या, यासाठी देशीविदेशी पर्यटकांकरिता या ठिकाणी मध्यभागी दर्शनी चौथरा उभारण्यात आला आहे. त्या पाठोपाठ ऐतिहासिक ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस व महापालिका मुख्यालय यांना जोडणाऱ्या भुयारी मार्गावरील छताचे रूपडेही लवकरच पालटणार आहे. सध्या या भुयारी छतावर ‘पोलीकार्बोनेट रुफ शीट’ आहे. त्याऐवजी स्टीलची चौकट तयार करून काचेचे छत तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

सीएसटी रेल्वे स्थानक व महापालिका मुख्यालय येथे दररोज देशीविदेशी पर्यटक भेट देत असतात. या ऐतिहासिक इमारतीसमोर छायाचित्रे काढतात. सध्या छतावर असलेल्या पोलीकाबरेनेट रुफ शीटमुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस व पालिका मुख्यालयाच्या इमारतीचा दर्शनी भाग झाकला जातो. या ऐतिहासिक इमारतींचा दर्शनी भाग स्पष्ट दिसावा, यासाठी नव्याने हे काचेचे छत बसवण्यात येणार आहे.

या कामासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. या भुयारी मार्गाच्या छताचे रूपडे पालटण्यासाठी २ कोटी ८७ लाख १६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत केंद्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी टर्मिनसची १० प्रेक्षणीय स्थळांमध्ये निवड करण्यात आली आहे. तसेच हे स्थानक पुरातन वास्तूंमध्ये मोडत असल्यामुळे या छताच्या बदलासाठी पुरातन वारसा विभागाकडूनही परवानगी घेण्यात आली आहे.