कराडच्या कृष्णा पुलाजवळ मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मोटरसायकलीवरून जाणाऱ्या ३९ वर्षीय बाबासाहेबांना गंभीर अपघात झाला. त्यांच्या पुतण्याने तात्काळ १०८ क्रमांकावर फोन फिरवला आणि काही वेळातच सुसज्ज रुग्णवाहिका तेथे पोहोचली. डॉक्टरांनी जागच्या जागी आवश्यक उपचार करून जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यामुळे बाबासाहेबांचा जीव वाचला.. राज्याच्या आरोग्य खात्याने सुरू केलेल्या ‘१०८ टोल फ्री’ रुग्णवाहिका सेवेच्या तत्परतेने वाचवलेला हा लाखावा जीव.
वेळेत उपचार न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाण्याचे प्रमाण मोठे आहे, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवाप्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ टोल फ्री’ रुग्णवाहिका सुविधेला अवघे सात महिने १६ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, एवढय़ाशा कालावधीत या सुविधेमुळे तब्बल लाखभर लोकांचे जीव वाचले. मंगळवारी रात्री कराडमधील बाबासाहेबांचे प्राण वाचवल्यानंतर बुधवारी पहाटेपर्यंत या सुविधेमुळे राज्यभरात आणखी २१ जणांना जीवदान मिळाले, हे लक्षणीय. विशेष म्हणजे, गेल्या सात महिन्यांत सुमारे १२०० महिला रुग्णालयाच्या वाटेवर याच रुग्णवाहिकेत सुखरूप बाळंत झाल्या.
राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी एक फेब्रुवारीपासून बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सहकार्यातून आपत्कालीन रुग्णवाहिका सुरू केली. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज व प्रशिक्षित डॉक्टर असलेल्या ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या सर्व जिल्ह्य़ांमध्ये रुग्णसेवेसाठी तैनात करण्यात आल्या. त्याचा मोठा फायदा अपघातग्रस्त आणि अत्यवस्थ रुग्णांना मिळत आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्य़ात महामार्गावर होणारे अपघात, ग्रामीण भाग आदींचा विचार करून रुग्णवाहिका तैनात ठेवल्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.
या योजनेतून आतापर्यंत ३८१ लोकांना रुग्णवाहिकेतच कृत्रिम श्वसन यंत्रणा पुरवण्यात आली, हृदयविकाराचा धक्का बसलेल्या ५० रुग्णांना रुग्णवाहिकेतच ‘डिफेब्रिलेटर’ उपकरणाच्या साहाय्याने शॉक देऊन त्यांचा जीव वाचविण्यात आला.
आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे लाखो रुग्णांना जीवनदान लाभत असून याचा फायदा अधिकाधिक लोकांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी केले. आपत्कालीन स्थितीत कुठूनही, कधीही ‘१०८’ क्रमांकावर दूरध्वनी केल्यास रुग्णवाहिका तत्परतेने तेथे पोहोचते, असे संस्थेचे मुख्य अंमलबजावणी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले. या उपक्रमामुळे एक लाख रुग्णांचे जीव वाचवू शकलो, हा आरोग्यमंत्री म्हणून माझ्यासाठी अत्यंत समाधानाचा क्षण असल्याचे सुरेश शेट्टी म्हणाले.
राज्यभरात ९३७ रुग्णवाहिका
*मुंबईत १४२, ठाण्यात ६०, नाशिकमध्ये ४६, पुण्यात ८४, नागपूर ४८
*प्रत्येक रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर, डिफेब्रीलेटर अशी अत्याधुनिक उपकरणे
*तज्ज्ञ डॉक्टरांसह सहा हजार कर्मचारी अहोरात्र कार्यरत