आपण एखादे संकेतस्थळ सुरू केल्यावर तेथे अनेक जाहिराती दिसतात. एखादी जाहिरात संकेतस्थळाच्या वरच्या बाजूस तर एखादी कोपऱ्यात काही वेळेस संकेतस्थळ पाहत असतानाच अचानक एखादी जाहिरात खिडकीसमोर येते आणि तिथे जाहिरात दिसू लागते. काही व्हिडीओ जाहिराती तर काही छायाचित्र जाहिरातींचा यामध्ये समावेश असतो. यातील बहुतांश जाहिरातींचा आपल्याला काही उपयोगही नसतो त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मग आपल्या आवडीच्या विषयाची जाहिरात आपल्याला दिसली तर.. हे शक्य होणार आहे ते जाहिरात क्षेत्रातील प्रोग्रॅमेटिक उत्क्रांतीमुळे. नेमके हेच तंत्रज्ञान घेऊन आशीष शहा यांनी व्हटरेझ नावाची कंपनी सुरू केली आहे.

अशी झाली सुरुवात

अगदी शाळेत असल्यापासून वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावण्याची आशीष यांना सवय होती. शाळा सुटल्यावर वडिलांच्या साडीच्या दुकानात जाऊन तेथे त्यांना लागेल ती मदत करणे हे आशीष व त्याच्या भावाचे नित्याचे काम. वडिलांकडून व्यवसायाचे बाळकडू घेऊन आशीष यांच्या भावाने वयाच्या अठराव्या वर्षीच शिक्षण सोडले आणि व्यवसायाकडे वळला. त्या वेळेस अगदी नव्या असलेल्या तंत्रज्ञानाला बरोबर घेऊन आशीषच्या भावाने कल्ल्िरां१ीटं्र’.ूे नावने संकेतस्थळ सुरू केले. १९९८च्या सुमारास परदेशी कामाला जाण्याची सुरुवात झाली होती पण ई-मेल, मोबाइलही तितकेचे सर्वांपर्यंत पोहोचले नव्हते. परदेशातून एखादे पत्र भारतात यायला किमान एक महिन्याचा कालावधी जायचा. अशा लोकांसाठी ही सेवा होती. या सेवेच्या माध्यमातून या संकेतस्थळावर संदेश आणि संदेश पोहोचवणाऱ्याचा पत्ता अशी माहिती दिल्यावर हा संदेश भारतात अंतर्गत पोस्टाच्या माध्यमाने पाठविला जात असे. या संकेतस्थळाचे मुख्य उत्पन्नस्रोत हे जाहिरात हे होते. मात्र त्या काळी इंटरनेट जाहिरातींवर फारसा कुणाचा विश्वास नसल्यामुळे कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मग आशीष यांनी आपल्या भावाच्या व्यवसायाला मदत करण्यास सुरुवात केली. याचबरोबर बीकॉमपर्यंतचे शिक्षणही घेतले. पुढे त्यांनी संकेतस्थळाचे डोमेन नाव आणि संकेतस्थळाला सव्‍‌र्हर उपलब्ध करून देण्याची सेवा सुरू केली. यानंतर तंत्रज्ञानाशी संबंधित विविध उद्योगांमध्ये या शहा बंधूंनी ट्रंकोझ समूहाच्या माध्यमातून शिरकावर करण्यास सुरुवात केली. आशीष यांच्या डोक्यात एक कल्पना सतत येत होती ती डिजिटल जाहिरातींची. या क्षेत्रात काही तरी वेगळे करण्याची त्यांची तयारी होती. यातच त्यांना परदेशात डिजिटल जाहिरातींमध्ये सुरू असलेल्या प्रोग्रॅमेटिक उत्क्रांतीची माहिती मिळाली. त्यालाच धरून भारतात व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आणि २०१२मध्ये व्हटरेझचा जन्म झाला.

असा चालतो व्यवसाय

प्रोग्रॅमेटिक उत्क्रांती म्हणजे काही सेकंदांचा खेळ असतो. म्हणजे जर आत्ता आपण इंटरनेटच्या माध्यमातून विम्याशी संबंधित एखादी माहिती वाचत आहोत. तर आपल्याला तेथे विमा कंपन्यांच्या जाहिराती दिसतील. यापूर्वी त्या संकेतस्थळावर आधीपासून जागा खरेदी करून दाखविल्या जाणाऱ्या जाहिराती दिसायच्या. या नव्या तंत्रज्ञानामुळे डिजिटल जाहिरात पुरविणाऱ्या कंपनीला कोणत्या आयपी पत्त्यावरून आत्ता कोणते संकेतस्थळ सुरू केले जाणार आहे याचा तपशील येतो. हा तपशील आला की हा सेवा पुरवठादार त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या जाहिरातदारांशी संपर्क साधतो व आता अमुक माहिती असलेले संकेतस्थळ सुरू होणार आहे तेथे तुम्हाला जाहिरात द्यायची आहे का? मग इच्छुक जाहिरातदारांमध्ये त्या जागेसाठी लिलाव होतो व त्या क्षणाला जो जास्त पैसे देतो त्याची जाहिरात

संबंधित व्यक्तीच्या डेस्कटॉप अथवा मोबालवर झळकते. ही सर्व गुंतागुंतीची प्रक्रिया अवघ्या २०० मिली सेंकंदात पार पडते. यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो. हे तंत्रज्ञान वापण्याबाबत भारतात अजून फारसा प्रसार झाला नसून तो लवकरच होईल अशी अपेक्षा आशीषने व्यक्त केली. या प्रकारच्या जाहिरात तंत्रज्ञानाला परदेशात मोठी मागणी आहे. आपल्याला पाहिजे त्या ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठीचा हा मार्ग असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आधीच्या जाहिरात व्यवसायातील काही निधी तसेच मित्र आणि कुटुंबातील काही सदस्यांकडून पैसे घेतले आहेत. आत्तपर्यंत या व्यवसायात ३ ते ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. या व्यवसायात आम्ही प्रकाशक म्हणजे संकेतस्थळ चालक आणि जाहिरात देणारा ब्रँड या दोघांनाही सेवा पुरवीत असतो. आम्ही या दोघांमधील डिजिटल दुवा असून हे काम करण्यासाठी आम्ही जाहितरात प्रसिद्ध झाल्यावर काही टक्के मोबदला घेतो असे आशीष यांनी नमूद केले.

नवउद्यमींना सल्ला

नवउद्योग सुरू करताना काही तरी नवे उत्पादन अथवा नवी सेवा उपलब्ध करून द्या. जर तुम्हाला सध्या बाजारात उपलब्ध असेलेली उपकरणे अथवा सेवा द्यायच्या असतील तर त्यात काही तरी नावीन्य आणा. तुमच्या आवाक्यात असेल अशाच व्यवसायाबद्दल विचार करा. तसेच पहिल्या दिवसापासून तुम्ही एका पेक्षा जास्त कसे व्हाल याचा विचार करा असा सल्ला आशीषने नवउद्यमींना दिला आहे. तसेच आपल्यासोबत काम करण्यासाठी योग्य माणसांचा निवड करा. तसेच आपल्या वाईट काळात उपयोगात येतील असा विशेष निधी हाती राखून ठेवा असा कानमंत्रही आशीषने दिला. आपल्याला जोपर्यंत पाठबळ आहे तोपर्यंत हार मानू नका. तसेच आपल्या व्यवसायात आणखी काय सुधारणा करता येईल याचा सातत्याने आवाढावा घेत राहा असा सल्लाही आशीष यांनी दिला.

भविष्यातील वाटचाल

भविष्यात अधिकाधिक व्यवसायांसोबत सहाकार्य करण्याचा आमचा मानस असून त्याद्वारे आमच्या जाहिरातदारांच्या आणि प्रकाशक गरजा पूर्ण करता येणार आहे. याचबरोबर आमच्या जाहिरातीच्या व्यवसायात सातत्याने काही तरी कल्पक करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. भविष्यात कदाचित थेट वापरकर्त्यांशी संवाद साधणाऱ्या जाहिरातीही प्रकाशित होऊ शकणार आहेत. याशिवाय न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को, लंडन, दुबई येथे आमच्या अस्तित्व निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

@nirajcpandit

Story img Loader