मुंबईतील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या आराखड्याला समितीने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब  यांचा ३५० फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखालील एकसदस्यीय समितीने सोमवारी या निर्णयाला मंजूरी दिली. त्यामुळे इंदू मिल परिसरात अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरात असणा-या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच पुतळा उभा राहणार आहे. याआधीच्या आराखड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची ही ८० फूट इतकी होती. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात ही उंची ८० फुटांवरून ३५० फूट इतकी वाढवण्यात आली आहे. याआधी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्मारक हे ६ डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होईल असे देखील सांगितले होते, परंतु अनेक अडचणीमुळे या स्मारकाचे काम रखडले होते. परंतु आता सुधारित आराखड्याला मंजूरी मिळाल्यामुळे या कामाला विशेष गती येणार आहे.
इंदू मिलच्या सुमारे बारा एकर जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक आंताराष्ट्रीय दर्जाचे असणार आहे. हे स्मारक संसदेच्या प्रतिकृतीप्रमाणेच दिसणार आहे. तसेच या स्मारकाच्या आराखड्यात नमूद करण्यात आलेल्या आर्ट गॅलरीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित कलाकृतीही ठेवल्या जाणार आहेत.

Story img Loader