माटुंगा, मध्य रेल्वे
महाविद्यालयांची गर्दी एखाद्या उपनगरात असली की तेथे पर्यायाने चमचमीत पदार्थाची खाद्य केंद्रे ही ओघाने येतातच. मात्र असे एखादेच उपनगर असते जेथे नावाजलेली महाविद्यालये आणि तितकीच प्रसिद्ध खाद्य केंद्रे असतात. अशा उपनगराला म्हणूनच वेगळे वलय प्राप्त होते. असेच ‘माटुंगा’ हे वलयांकित उपनगर मध्य रेल्वेवर असून तरुणाईचा वावर, उत्तम चवीची हॉटेल्स, बडय़ा शैक्षणिक संस्था त्याच बरोबरीने उद्याने आणि जुन्या बाजारपेठेसह जुन्या चाळी व मोठय़ा इमारती येथे आहेत. तसेच सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ख्याती असल्याने माटुंगा हे स्थानिकांच्या अभिमानाचा भाग आहे. स्थानकाच्या पूर्वेलाच बाहेर पडण्याची सोय असून स्थानकाच्या जुन्या लाकडी कमानवजा रचनेखालून बाहेर पडल्यावर मांटुग्याचे हे सारे वैभव रेल्वे स्थानकातून बाहेर पडताक्षणीच डोळ्यांना दिसण्यास सुरुवात होते. त्यात चांगले मुख्य व अंतर्गत रस्ते हे स्थानक व नजीकच्या भागात असल्याने नागरिकांना यातूनही दिलासा मिळतो. स्थानक परिसराच्या डावीकडे मोठय़ा दुकानांबाहेर फळ व भाज्यांची बाजारपेठ अनेकांना आकृष्ट करते. कारण ज्वेलर्स, किराणा, मोठय़ा उत्पादनांची दालने यांच्या पुढय़ातच या फळ-भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान थाटले आहे. या बाजारपेठ परिसरात एकंदरीत दक्षिण भारतीय व विशेषत: आंध्रातील रहिवाशांची संख्या जास्त असल्याने दुकानांच्या पाटय़ा मराठी व इंग्रजीसह मूळ भाषेतही असतात. तर स्थानकाच्या उजवीकडून तरुणाईची धावपळ आपापल्या महाविद्यालयांकडे होताना दिसते. त्यामुळे ठिकठिकाणी तरुणाईचे घोळके उभे राहून आपल्या गप्पा व हास्यकल्लोळाने परिसर व्यापून टाकतात. या घोळक्यांना उभे राहण्यासाठी औचित्य असावे यासाठी येथे अनेक खाद्य केंद्रे येथे उभी राहिली असून फ्रँकी, सॅण्डवीच, बर्गर, चाट, चायनीज आणि दक्षिण भारतीय पदार्थाची ही खाद्य केंद्रे पदपथावर मोठय़ा संख्येने उभी राहिली आहेत. स्थानकाच्या डावीकडे काही जुन्या चाळी तर उजवीकडील उंच इमारती आणि बंगले मराठी वस्तीचा जादा टक्का असल्याचे आपल्या ठेवणीवरून सांगून जातात. तसेच उद्याने, मैदाने व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल यामुळे जीवन जगण्याच्या सगळ्याच प्रेरणा स्थानक परिसरातून माटुंगा उपनगरात शिरताना जाणवतात.

कट्टय़ावरून क्रिकेटचा आनंद
रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर उजवीकडे गेल्यास मेजर रमेश दडकर हे मोठे मैदान लागते. अत्यंत जुन्या काळापासूनच येथे क्रिकेट व अन्य क्रीडा प्रकारांचा सराव चालत असून अनेक जण दररोज मैदानाच्या कट्टय़ावर बसून सीझन क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद लुटतात. या मैदानाच्या समोरच पोद्दार व रुईया आदी महाविद्यालये आणि वेलिंगकर व्यवस्थापन संस्था आपल्या दिमाखात उभ्या आहेत. तसेच, किंग्स सर्कलवरून पुढे गेल्यास खालसा महाविद्यालय, वीजेटीआय, रसायन तंत्रज्ञान संस्था आदी सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था लागोपाठ उभ्या आहेत. त्यामुळे येथे अनेक जण प्रवेश घेण्यासाठी रांगा लावत असतात.

गुप्ता चाट सेंटर
माटुंगा स्थानकातून बाहेर पडतो न पडतो तोच गुप्ता चाट सेंटरचे मोठे खाद्य केंद्र खवय्यांना आकर्षित करून घेते. शेवपुरी, पाणीपुरी या पारंपरिक चाट प्रकारांपेक्षा चीज शेवपुरी ते ग्रील्ड शेवपुरीपर्यंतचे सगळेच प्रकार मिळतात. तीस रुपयांपासून थेट नव्वद रुपयांपर्यंत या चाट प्रकाराच्या किमती आहेत. याचबरोबरीने मक्याचे पदार्थ, पिझ्झा, सॅण्डवीच, ज्यूस व मिल्क शेक आदींवर अनेक जण ताव मारताना येथे दिसतात.

खाण्यापिण्याची चंगळ
माटुंग्यात स्थानक परिसरात अनेक खाऊची ठिकाणे असून वेलिंगकर व्यवस्थापन संस्थेजवळ कॅफे गुलशन, स्नो पॉइंट स्नॅक्स, बोगोटो कॅफे असून यांच्याभोवती युवांचा गराडा पडलेला असतो. तरुणाईची चंगळ म्हणून की काय या हॉटेलांव्यतिरिक्त रस्तो-रस्ती शीतपेयांचे, बर्गर-सॅण्डवीचेसचे स्टॉल्स उभे दिसतात. तसेच येथेच दक्षिण भारतीय व्यंजनांचे तंबी रेस्टॉरंट असून कुटुंबासह येथे जाता येते. तसेच स्थानकाच्या डावीकडेच रमा यांचे दक्षिण भारतीय थाळीचे प्रसिद्ध हॉटेल चांगल्या दरात उत्तम जेवण देते.

माहेश्वरी उद्यान
किंग्स सर्कल या महामार्गावरील प्रसिद्ध ठिकाणी खरे सर्कल म्हणून ‘माहेश्वरी उद्यान’ आहे. अत्यंत प्रशस्त व गोलाकार पसरलेले हे उद्यान हिरवाईने नटले आहे. वरून उड्डाण पूल गेला असून त्याखालोखाल या उद्यानाची रचना केली आहे. उद्यानातील कचरा उद्यानातच जिरवला जात असून स्वच्छतेच्या बाबतीत इतर मुंबईपेक्षा हे उद्यान चांगले आहे. आसन व्यवस्था व हिरवे गवत यांमुळे अनेक जण येथे विरंगुळ्याचे काही क्षण अनुभवण्यास आवर्जून येतात.