‘ढोलताशे’च्या पाश्र्वभूमीवर दिग्दर्शक विजय केंकरे यांची स्पष्टोक्ती
रस्त्यावर उतरून उत्सव व प्रत्येक गोष्ट साजरी करण्याचे प्रमाण वाढले आहे आणि यालाच धर्म समजले जात आहे. ही खूप मोठी चूक आहे, असे परखड मत नाटय़दिग्दर्शक विजय केंकरे यांनी व्यक्त केले.
‘लोकसत्ता’ने ‘संपादक शिफारस’ म्हणून पुरस्कृत केलेल्या ‘ढोल-ताशे’ या नाटकाच्या प्रयोगानंतर बोलत होते. ‘लोकसत्ता’चे रवींद्र पाथरे यांच्याशी नाटकानंतर संवाद साधताना त्यांनी वरील विधान केले.
‘ढोल ताशे’ हे नाटक आपल्याकडील सार्वजनिक उत्सवातील उन्माद, ध्वनी तसेच वायू प्रदूषण आणि सार्वजनिक उत्सवातील अनिष्ट गोष्टींवर ताशेरे ओढणारे आहे. उत्तम रंजनमूल्य हे या नाटकाचे वैशिष्टय़ आहे. सध्याच्या परिस्थितीत हे नाटक रंगभूमीवर येणे ही काळाची गरज होती हे ओळखून ‘लोकसत्ता’ने ‘संपादक शिफारस’ म्हणून हे नाटक पुरस्कृत केले आहे.
विजय केंकरे पुढे म्हणाले की १९९९ साली ‘आविष्कार’ या संस्थेसाठी हे प्रायोगिक नाटक म्हणून केले होते. सार्वजनिक उत्सवांचे ‘सेलिब्रेशन’ आता अनिष्ट दिशेने चालले आहे. त्यामुळे आज १५-१६ वर्षांनी पुन्हा हे नाटक करण्याची गरज निर्माण झाली. सार्वजनिक उत्सवांची आजची परिस्थिती बदलायचे तर सोडाच पण, ती अधिक वाईट झाली आहे व राजकारणी मंडळी याला खतपाणी घालत आहेत.
एकूणच उत्सव आणि सेलिब्रेशनकडे सरकार असंवेदनशीलतेने पाहते. त्यामुळेच मध्यंतरी पुरस्कार परत करण्याचे जे प्रकार झाले त्याचीही टिंगल झाली. त्यांची टिंगल न करता राज्यकर्त्यांनी त्यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. या पाश्र्वभूमीवर एकूणच समाजाच्या संवेदनशीलतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यासाठी हे नाटक करणे मला गरजेचे वाटले, असेही केंकरे म्हणाले.
नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी म्हणाले की, हे नाटक सकस संहितेचे असून ते रंगभूमीवर येणे गरजेचेच होते.
नाटकातील अभिनेते व नेपथ्यकार राजन भिसे म्हणाले की, यापूर्वीच्या प्रायोगिक व आताच्या व्यावसायिक नाटकाची नेपथ्यरचना मी केली. मात्र आता यातील रंगमंचीय अवकाश बदलला आहे. या नाटकातील माझी भूमिका यापूर्वी डॉ. हेमचंद्र अधिकारी यांनी केली होती. त्यांची भूमिका पेलण्याचे आव्हान खूप मोठे होते.
नाटकाचे संगीतकार राहुल रानडे म्हणाले, ‘नाटकातील संगीत फार वेगळ्या पद्धतीचे असून नाटक सुरू असताना मागून संगीत कायम चालू ठेवणे ही वेगळी बाब होती. याचा कलाकारांना काहीसा त्रास होत असला तरी तो एक वेगळा प्रयोग ठरला.’
व्यावसायिक नाटय़सृष्टीत प्रवेश करणारा अभिनेता ललित प्रभाकर म्हणाला की, जेव्हा निर्मात्यांनी मला या नाटकाबद्दल विचारले, तेव्हा मी त्यांना लगेच होकार कळवला. कारण नाटकामध्ये वेगळा विचार मांडला असून, तो लोकांपर्यंत पोचणे गरजेचे होते.
नाटकात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी अकांडतांडव करणाऱ्या अभिनेत्री उज्ज्वला जोग यांनी मात्र प्रत्यक्षात मी या नाटकात जे विचार मांडलेले आहेत, त्याच्याशी पूर्ण सहमत आहे, अशी भूमिका मांडली.
अभिनेत्री क्षिती जोग यांनी देखील विषय चांगला असल्याने नाटकात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या प्रयोगासाठी नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर, अभिनेता प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, शैलेश दातार, मंगेश कदम, नाटककार वामन तावडे, दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर, अभिनेते अनिल गवस आदी नाटय़सृष्टीतील मान्यवर हजर होते.
रस्त्यावर उत्सव साजरे करण्याला धर्म समजणे ही चूकच!
‘ढोलताशे’च्या पाश्र्वभूमीवर दिग्दर्शक विजय केंकरे यांची स्पष्टोक्ती
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 13-02-2016 at 02:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Festival celebrated on the street