‘ती’ची सकाळ शुक्रवारी नेहमीप्रमाणेच उगवली.. घाईगर्दीत गाडी पकडणेही ‘ती’च्यासाठी नेहमीचेच.. मात्र, रेल्वेगोंधळामुळे इतर प्रवाशांप्रमाणे ‘ती’ही अडकली.. दगडफेक, लाठीमार या प्रकारामुळे उडालेल्या गोंधळामुळे भेदरलेल्या ‘ती’ने सुरक्षित ठिकाण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. नेमकी हीच वेळ साधून गर्दीतील एका टोळक्याने ‘ती’ला घेरले आणि जबरदस्तीने मालगाडीच्या आडोशाला नेऊन ‘ती’च्यावर अतिप्रसंग करण्यास सुरुवात केली. मात्र, वेळीच एका पोलीस उपनिरीक्षकाच्या लक्षात तो प्रकार आला. प्रसंगावधान राखत त्याने त्या टोळक्याच्या दिशेने हवेत गोळीबार केला आणि ‘ती’ची सुटका केली. ‘ती’च्या मनावर मात्र हा प्रसंग कायमचा ओरखडा ठेवून गेला.. गोंधळाचा फायदा घेत असहाय तरुणीवर बलात्कार करण्याचा हा अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार दिव्यात घडला.
‘अग्रलेख : एक ‘दिवा’ भडकला..’
ठाकुर्ली स्थानकानजीक पेंटोग्राफ तुटल्याने शुक्रवारी सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होती. त्यामुळे दिवा स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. रेल्वे स्थानकात मिळेल त्या साहित्याची नासधूस करत संतप्त प्रवाशांनी पोलीस आणि खासगी वाहनांनाही लक्ष्य केले. तोडफोड, दगडफेक, लाठीमार या प्रकारांमुळे तेथील महिला प्रवासी भेदरल्या आणि स्थानकाबाहेर पडण्यासाठी गर्दीतून वाट काढत दिसेल त्या दिशेने पळू लागल्या. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे काही अधिकारी या महिलांना सुरक्षितपणे स्थानकाबाहेर जाण्यासाठी मदत करीत होते. त्याच वेळी एका पोलीस उपनिरीक्षकाची नजर स्थानकापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या मालगाडीजवळ गेली. त्यांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणी बघ्यांमधीलच वाटणाऱ्या १०-१५ जणांचे टोळके उभे होते. तेथे ही गर्दी का जमली आहे असा प्रश्न या अधिकाऱ्याला पडला. त्यांनी निरखून पाहिले तेव्हा मालगाडीच्या डब्यातून एका तरुणीचा मदतीचा हात त्यांना दिसला. त्याबरोबर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या घोळक्याच्या दिशेने हवेत गोळीबार केला. ते पाहून पाचावर धारण बसलेल्या त्या टोळक्याने तेथून पळ काढला. मालगाडीत अर्धविवस्त्र अवस्थेतील पंचविशीतील एक तरुणी हतबल अवस्थेत पडल्याचे या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आले. तिचे कपडे फाडलेले होते. तेव्हा त्यांनी आपला खाकी शर्ट त्या तरुणीला दिला. त्यानंतर आलेल्या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करीत तिची रवानगी लगतच्या एका घरात केली.
या भयंकर प्रकारामुळे त्या मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला असून ती कोणाशीही काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याने या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र आपण या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असून, लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader