निवडणुकींचा कालावधी आला की, संभाव्य उमेदवारांपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांनाच जास्त ताण जाणवायला लागतो. निवडणूक कामांच्या नियोजनातील ढिसाळपणा, त्यामुळे होणारी परवड या सर्व गोष्टींची कर्मचारी प्रचंड धास्ती घेतात. यंदाचे वर्षही या सर्वाला अपवाद नसून मुंबईत २४ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या पाश्र्वभूमीवर सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिरांचा पुरता बोजवारा उडाला आहे. प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांना भलत्या ठिकाणी बोलावून दुसऱ्याच ठिकाणी पाठवणे, सकाळी ८.०० वाजता बोलावून दुपारी दीडपर्यंत ताटकळत ठेवणे, उपहारगृह किंवा तत्सम सुविधा यांचा अभाव अशा अनेक गोष्टींचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.
निवडणूक कामाच्या प्रशिक्षणासाठी मंत्रालय, महापालिका आदी सरकारी कार्यालयांतील काही कर्मचाऱ्यांना सायन कोळीवाडा येथे बुधवारी सकाळी ८.०० वाजता येण्यास सांगण्यात आले होते. कर्मचारी तेथे जमा झाल्यानंतर तासाभराने त्यांची हजेरी घेतली गेली आणि तुम्हाला येथे नाही, तर दुसऱ्या मतदारसंघात जायचे आहे, असे सांगण्यात आले. हे मतदारसंघ कुलाबा, मलबार हिल, मुंबई सेंट्रल अशा ठिकाणी होते. या मतदारसंघातील कर्मचाऱ्यांनाही दुसऱ्या मतदारसंघात जाण्याचे आदेश देण्यात आले. सायन कोळीवाडा येथे उरलेल्या कर्मचाऱ्यांना बसवून ठेवण्यात आल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण गट ‘क’ कर्मचारी संघटनेच्या लता अरगडे यांनी सांगितले.
काही मतदारसंघांतील कर्मचाऱ्यांची काहीच सोय करण्यात आली नाही. आम्ही आमचे पैसे खर्च करण्यास तयार होतो, मात्र प्रशिक्षणस्थळी उपहारगृह उघडण्याचे सौजन्यही निवडणूक कार्यालयाने दाखवले नाही. तसेच प्रशिक्षण सुरू न झाल्याने कोणाची परवानगी घेऊन बाहेर जाऊन खायचे, याबाबतही कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांनी दुपारी दीड-दोन वाजता आम्हाला घरी जाण्यास सांगितले. आमचे प्रशिक्षण २३ तारखेला होईल, असे सांगण्यात आल्याचे अरगडे म्हणाल्या. अनेक ठिकाणी तर मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी येऊन प्रशिक्षण घ्यायला सांगण्यात आले.

Story img Loader