अपघात टाळण्यासाठी विशेष उपकरणाची मदत ; येणाऱ्या गाडय़ांची सूचना मिळणार
रेल्वेच्या परिचालनाचा कणा मानल्या जाणाऱ्या गँगमनच्या सुरक्षेसाठी आता गँगमनबरोबर ‘रक्षक’ दिला जाणार आहे. रेल्वेरुळांवर देखभाल-दुरुस्तीचे काम करणाऱ्या गँगमनचा अपघातात बळी जात असल्याने रेल्वेने ही उपाययोजना केली आहे. मात्र हा ‘रक्षक’ म्हणजे कोणी हाडामांसाचा माणूस नसून एक उपकरण आहे. गँगमन काम करत असताना त्या ठिकाणी येणाऱ्या रेल्वेगाडय़ांची आगाऊ सूचना ‘रक्षक’ गँगमनला देणार आहे.
रेल्वे मार्गाची देखभाल-दुरुस्ती करण्याचे काम गँगमन अहोरात्र करत असतात. मात्र सध्याच्या घडीला या गँगमनची संख्या कमी असून एके काळी ४५ ते ५० गँगमन असलेल्या गँगमध्ये आता जेमतेम २० ते ३० गँगमन उरले आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अशक्य असल्याचे गँगमन सांगतात. परिणामी गेल्या काही वर्षांत रुळांवर काम करणाऱ्या गँगमनना चालत्या गाडीने उडवल्याचे प्रकार घडले आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात गँगमनसह रक्षक हे उपकरण देण्याची घोषणा केली आहे. रुळांवर कामाला जाताना गँगमनकडे हे उपकरण असेल. गँगमन काम करत असताना किंवा रुळांवरून चालताना एखादी गाडी त्या ठिकाणी येणार असेल, तर हे उपकरण ‘जीपीएस’ वा अन्य तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्या गाडीची माहिती खूप आधीच गँगमनपर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे गाडी येईपर्यंत गँगमनना सुरक्षित ठिकाणी पोहोचणे शक्य होईल. हे उपकरण लवकरच गँगमनच्या हाती येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.