महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचून प्रत्येकाला काळाचे भान करून देणाऱ्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिका आणि पंचांगाचे संस्थापक, ज्योतिष आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मराठी व्यापारी संस्था, मराठी उद्योजक-व्यावसायिकांचे प्रमुख आधारस्तंभ ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांचे मंगळवारी पहाटे हिंदुजा रुग्णालयात वृद्धापकालीन आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. साळगांवकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि धर्मशास्त्राचा गाढा अभ्यासक काळाआड गेल्याची भावना विविध थरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
 गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती-अस्वास्थ्यामुळे साळगांवकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी दुपारनंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. जयंतरावांच्या निधनाचे वृत्त पसरताच सकाळपासूनच माटुंगा येथील लक्ष्मी सदन या त्यांच्या निवासस्थानी असंख्य चाहत्यांची रीघ लागली. संध्याकाळी साळगांवकर यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाल्यावर वाटेतही असंख्य चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. शिवाजी पार्क स्मशानभूमीत जयंतरावांचे ज्येष्ठ पुत्र जयराज यांनी त्यांच्यावर अग्निसंस्कार केले. विविध क्षेत्रातील त्यांचे असंख्य चाहते यावेळी उपस्थित होते.
राजकारण, उद्योग, कला, साहित्यक्षेत्रातील नामवंतांनी साळगांवकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. सार्वजनिक गणेशोत्सवाला शिस्तीचे भान देण्यासाठी साळगांवकरांनी अविरत प्रयत्न केले होते. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवापूर्वीच साळगांवकर यांचे निधन झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना धक्का बसला आहे.