आरेतल्या वृक्षतोडीबाबत जितेंद्र आव्हाड यांनी वृक्षतोडीवरुन एक व्यंगचित्र ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आरेमधली वृक्षतोड एका रात्रीत करण्यात आली. त्यानंतर तिथे आंदोलनही करण्यात आलं. मूक आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र आरे कारशेडसाठी जी वृक्षतोड करण्यात आली त्याचा सगळ्यांनीच निषेध केला. जितेंद्र आव्हाड यांनाही या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता जितेंद्र आव्हाड यांनी एक व्यंगचित्र ट्विट करुन निशाणा साधला आहे.
काय आहे व्यंगचित्रात?
आरेतील झाडांवर महायुतीच्या धनुष्यातून कमळ बाण सोडण्यात आला असल्याचे दाखवण्यात आले आहे. या कमळ असलेल्या बाणामुळे झाडं कापली गेली आहेत असे दाखवण्यात आले आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्य बाण आहे. तर भाजपाचे चिन्ह कमळ आहे. या दोन्ही चिन्हांचा समर्पक वापर या व्यंगचित्रात करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेची सत्ता आहे तर राज्यातलं सरकार महायुतीचं आहे. या दोघांनी संगनमत करुनच आरेतल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवली हा आशय या व्यंगचित्रातून दाखवण्यात आला आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 11, 2019
आरे परिसरात झालेल्या वृक्षतोडीनंतर आंदोलन करण्यात आलं. दोन दिवस या ठिकाणी कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचं कलमही लागू करण्यात आलं होतं. आरेमधल्या वृक्षतोडीचा विरोधी पक्षांनी निषेध तर नोंदवलाच होता. पण शिवसेनेनेही निषेध नोंदवला. शिवसेनेची सत्ता आल्यावर आम्ही आरेला जंगल घोषित करु अशी घोषणा आदित्य ठाकरेंनी केली. ज्यावरुन सोशल मीडियावर आदित्य ठाकरे चांगलेच ट्रोलही झाले. आता याच सगळ्या आरे वृक्षतोडीवरुन जितेंद्र आव्हाड यांनी एक व्यंगचित्र ट्विट करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.