अशोक चंदनमल जैन यांचा जन्म ११ एप्रिल १९४४ रोजी पुणे जिल्हय़ातील घोडेगाव इथे झाला. १९६४ साली ते बी.ए.ची पदवी मिळवली. कॉलेजजीवनात असतानाच त्यांनी पुण्यातील दै. सकाळमधून पत्रकारितेचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यानंतर पुण्यातील दै. तरुण भारतमध्ये काम केल्यानंतर ते दै. केसरीमध्ये रुजू झाले. १९६६ साली जैन यांनी मुंबईला स्थलांतर करून महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करायला सुरुवात केली. एक तपानंतर ते म.टा.चे विशेष प्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेले. ७८ ते ८९ या काळात त्यांनी दिल्लीहून ‘राजधानीतून’ या नावाने साप्ताहिक वार्तापत्रे लिहिली. जैनांची चौफेर दृष्टी, त्यांचा विचक्षणपणा, हजरजबाबीपणा आणि त्यांच्या खेळकर शैलीने ही वार्तापत्रे चांगलीच गाजली. त्यामधून जैन यांच्या पत्रकार शैलीचे सर्व विशेष दिसून येतात. सुमारे दशकभर दिल्लीत राहून जैन यांनी राजकीय वर्तुळामध्ये स्वत:चे असे वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण केले.
१९८९ साली मटाचे सहसंपादक झाल्यावर ‘मैफल’ या पुरवणीची जबाबदारी देण्यात आली. चौफेर वाचन, वेगवेगळ्या विषयांचा पाठपुरावा आणि नावीन्यता या प्रकारांनी त्यांनी या पुरवणीला प्रतिष्ठा मिळवून दिली. पुरवणीतील लेख केवळ आकर्षक लेआऊट करूनच वाचनीय करता येतात असे नाही तर आकर्षक शीर्षकं, इंट्रो यांचाही त्यात मोठा वाटा असतो हे त्यांनी दाखवून दिले. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘परमेश्वराला रिटायर करा’ या एकाच लेखाचे उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे. याचबरोबर त्यांनी कलंदर या टोपणनावाने ‘कानोकानी’ हे राजकीय-सामाजिक-साहित्यिक-सांस्कृतिक घटना-घडामोडींवर मिश्कील टिप्पणी करणारे सदर लिहायला सुरुवात केली. त्यांनी म.टा.चे सहसंपादक, वरिष्ठ सहसंपादक आणि कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. ‘कानोकानी’ या त्यांच्या सदराचे याच नावाचे व त्याचा पुढचा भाग ‘आणखी कानोकानी’ या नावाने प्रकाशित झाला. या शिवाय ‘सोंग आणि ढोंग’ (२००१), ‘राजधानीतून’ (२००३), अत्तराचे थेंब (२००९) ही त्यांची स्वतंत्र पुस्तके.
 अशोक जैन यांनी पत्रकार म्हणून जशी वैशिष्टय़पूर्ण कामगिरी केली आहे, तशीच त्यांनी अनुवादक म्हणूनही उत्तम कामगिरी केली आहे. इंग्रजीतील अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे त्यांनी सुबोध मराठीत अनुवाद केले आहेत.  ‘इंडिया टुडे’च्या दोन अंकात इंदिरा गांधींवरील पुपुल जयकर यांच्या आगामी चरित्राचे भाग आले होते. ते वाचल्यावर राजहंस प्रकाशनच्या दिलीप माजगावकर यांना असं वाटलं की, हे पुस्तक उत्तम असणार. ते त्याचे हक्क घेण्याच्या मागे लागले. तेव्हा त्याच्या अनुवादासाठी श्रीकांत लागू यांचं नाव आलं. ते त्यांच्याकडे गेले. पण त्यांनी ‘याचा माझ्यापेक्षा अशोक जैन चांगला अनुवाद करील,’ असं सुचवलं. जैन दिल्लीत होते. त्यामुळे त्यांनी लेखकाने अनुभवलेला सगळा काळ, माहोल अनुवादात उतरवण्याचा प्रयत्न केला. आणि तो अनुवाद मोठय़ा प्रमाणावर यशस्वी ठरला. पुढे जैन यांनी पुपुल जयकर यांचे ‘इंदिरा गांधी’, पी. सी. अलेक्झांडर यांचे ‘इंदिरा- अंतिम पर्व’, हरीश भिमानी यांचे ‘लतादीदी’, आर. के. लक्ष्मण यांचे आत्मचरित्र ‘लक्ष्मणरेषा’ या नावाने, आर. के. नारायण यांची ‘स्वामी व त्याचे दोस्त’, ‘बॅचलर ऑफ आर्ट्स’, पी. व्ही. नरसहिंर राव यांचे ‘अंतस्थ’, अरुण गांधी यांचे ‘कस्तुरबा- शलाका तेजाची’, पी. पी. श्रीवास्तव यांचे ‘लालबहादूर शास्त्री’, पी. एन. धर यांचे ‘इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही’, सत्यजित राय यांची ‘फेलुदा’ ही पुस्तकमालिका आणि शरददिंदू बंदोपाध्याय यांच्या ‘व्योमकेश बक्षी – रहस्यकथा’असे विविध अनुवाद केले आहेत.
सुमारे दशभरापूर्वी जैन यांना अर्धागवायूचा झटका आला. तेव्हापासून त्यांच्या हालचालीवर आणि लेखनावरही मर्यादा आल्या. मात्र त्यावर मात करत त्यांनी काही अनुवाद पूर्ण केले. त्यांची पत्नी सुनीती जैन यांनी त्यांना मदत केली. नटवर सिंग यांच्या ‘वॉकिंग विथ द लॉयन’ या पुस्तकांचा अनुवाद  प्रकाशनाधीन आहे.