विविध मराठी चित्रपट, हिंदी तसेच मराठी मालिका आणि अनेक नाटकांतून आपल्या खास शैलीदार अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार (६४) यांचे सोमवारी निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून अंधेरीच्या कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीवर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात त्यांचे वडील, पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

‘वजीर’, ‘गुपचूप-गुपचूप’, ‘सर्जा’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘अरे संसार संसार’ अशा काही चित्रपटांमधून आपल्या दमदार आवाजाने आणि वेगळ्या अभिनय शैलीने कुलदीप पवार यांनी छाप पाडली.
‘वीज मिळाली धरतीला’, ‘अश्रूंची झाली फुले’ अशा काही नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिकाही रसिकांच्या स्मरणात राहणाऱ्या ठरल्या. चित्रपट, नाटक यांबरोबरच त्यांनी छोटय़ा पडद्यावरही काही हिंदूी व मराठी मालिकांमधून भूमिका केल्या. त्यांनी काम केलेल्या ‘तूतू मैंमैं’ आणि ‘परमवीर’ या दोन मालिका विशेष गाजल्या. गेल्या वर्षी त्यांनी अभिनय केलेल्या ‘भारतीय’ चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. यात त्यांनी साकारलेला गावचा पुढारी चांगलाच नावाजला गेला होता. मराठीतील भारदस्त आवाज आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणून कुलदीप पवार यांच्याकडे पाहिले जात होते.
त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यासाठी ते कोल्हापूर सोडून मुंबईत आले. मात्र हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. कराड, पुणे, असे मुक्काम गाठत त्यांनी मुंबई गाठली. तोपर्यंत त्यांच्या नावावर ‘एक माती अनेक नाती’ हा एकमेव चित्रपट होता. पण मुंबईत काम मिळवण्यासाठी या चित्रपटातील काम अपुरे होते. मात्र याच दरम्यान त्यांची भेट ‘नाटय़संपदा’च्या प्रभाकरपंत पणशीकर यांच्याशी झाली. पणशीकर त्या वेळी ‘इथे ओशाळला मृत्यू’साठी ‘संभाजी’ शोधत होते. पवार यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि दमदार आवाज, यामुळे पणशीकर यांनी संभाजीच्या भूमिकेची जबाबदारी पवार यांच्यावर टाकली आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.