विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील सात जागांसाठीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. सातपैकी तीन जागी काँग्रेसने बाजी मारली, तर शिवसेनेने दोन जागांवर यश प्राप्त केले. राष्ट्रवादी आणि भाजपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला, तर नागपूरात भाजपचे गिरीश व्यास यांची बिनविरोध झाल्याचे याआधीच घोषित करण्यात आले होते. काँग्रेसने ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारच मागे घेऊन ही जागा भाजपला आंदण दिली होती.
मुंबईत रामदास कदम आणि भाई जगताप विजयी-
मुंबईतील दोन जागांपैकी एका जागेवर शिवसेनेचे रामदास कदम यांनी दणदणीत विजय मिळवला, तर दुसऱया जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसच्या भाई जगताप यांनी बाजी मारली. भाई जगताप यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांचा दोन मतांनी पराभव केला. भाजपने अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोराच्या बाजूने झुकले तरी मनसेचे तटस्थ राहणे, राष्ट्रवादीची साथ आणि शिवसेनेने दुसऱ्या पसंतीची मते कोणालाही न देणे या साऱ्या घडामोडी काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या पथ्यावरच पडल्या. सर्वच पक्षांमध्ये फाटाफूट झाल्याचे चित्र असल्याने विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दुसऱ्या जागेची उत्कंठा होती. अखेर भाई जगताप यांनी बाजी मारून प्रसाद लाड यांना धक्का दिला.
कोल्हापूरच्या प्रतिष्ठेच्या लढाईत सतेज पाटील यांची बाजी-
सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी कोल्हापूरची जागा काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी जिंकली. सतेज पाटील यांनी बंडखोर आमदार महादेवराव महाडिक यांना परभवाचा धक्का दिला. सलग तीनवेळा या मतदार संघात महाडिकांनी बाजी मारल्याने ते निवडणुकीच्या तंत्राआधारे यंदाही आघाडी घेतील, असे म्हटले जात होते. मात्र, पहिल्यांदाच ही निवडणूक लढवणाऱ्या सतेज पाटलांनी तोडीस तोड यंत्रणा उभी करीत महाडिकांना कडवे आव्हान दिले. पाटील यांनी महाडिकांचा ६५ मतांनी पराभव केला.
धुळे-नंदुरबारचा गड काँग्रेसने राखला-
काँग्रेसचे अमरिश पटेल यांनी ३९२ मतांपैकी तब्बल ३५२ मते मिळवून धुळे-नंदुरबारचा काँग्रेसचा गड राखला. अमरिश पटेल यांच्या विरोधात उभे असेलेले भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. शशिकांत वाणी यांना केवळ ३१ मते पडली. भाजपने नंदुरबार जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यास उमेदवारी देत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. नंदुरबार जिल्ह्य़ातील आघाडीच्या मतदारांनाही आपल्याकडे खेचण्यासाठीे ही चाल युतीने खेळली अशी चर्चा होती. या मतदारसंघाने कायम आघाडीची साथ दिली आहे. पण भाजपच्या खेळीला यश आले नाही. मतदारांनी अमरिश पटेल यांच्या बाजूने कौल दिला.
अकोल्यात शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया विजयी-
बुलढाणा-अकोल्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिसन बजोरिया यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साजरी केली. बजोरिया यांनी  राष्ट्रवादीचे रवी सपकाळ यांच्यावर मात केली. बजोरियांना ५१३  तर सपकाळ यांना २३९ मते मिळाली.
सोलापूरातून प्रशांत परिचारक जिंकले-
सोलापूरात भाजप-शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीच्या दिपक साळुंखे यांना धूळ चारली. प्रशांत परिचारक यांचा २४१ मतांनी विजय झाला.
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व-
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या अरुण जगताप यांनी २४४ मतांसह विजय खेचून आणला आहे. त्यांनी शिवसेनेच्या शशीकांत गाडे यांचा पराभव केला. जगताप यांना २४४ तर शशीकांत गाडे यांना १७७ मते मिळाली.

Story img Loader