बुलेट ट्रेन, शेतकरी कर्जमाफी, जीएसटी, नोटाबंदी, महिला सुरक्षा, हिंदुत्व आदी मुद्द्यांवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यात भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. पण शेंडी आणि जानवेवाले हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. गायीला जपायचे आणि महिलांना झोडायचे असले हिंदुत्व आम्हाला नको. तुमची हिंदुत्वाची व्याख्या नेमकी काय आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. राजकारणासाठी हिंदुत्व फोडू नका. ते पाप तुम्ही कराल तर तुमचे नशीब फुटतील, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईतील दसरा मेळाव्यात सुरुवातीला एल्फिन्स्टन दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबई आणि उपनगरांतील गर्दीच्या स्थानकांमधील सर्वच जिने आणि पूल रुंद करा, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेनवरून भाजप सरकार, रेल्वे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. देशात फक्त मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन का? मुंबईकरांच्या खांद्यावर बुलेट ट्रेनचे ओझे कशासाठी? बुलेट ट्रेन म्हणजे फुकटचा नागोबा असल्याचेही ते म्हणाले. जीएसटी, महागाईवरूनही त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. अच्छे दिन येण्याची वाट ही जनता पाहत आहे. ज्या आशेवर तुम्हाला जनतेने निवडून दिले, त्यांच्या आशा पूर्ण करा, असे आवाहनही त्यांनी केले. जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी केले तर तुमचे सरकार टिकेल, असा इशारा त्यांनी पंतप्रधान मोदींना दिला. जीएसटी कर लागू केला. दर समान कर लावला असेल तर समान दरही लावा, असेही ते म्हणाले.

नोटाबंदीवरही त्यांनी भाष्य केले. नोटाबंदी झाल्यानंतर सर्वात आधी आम्ही विरोधात बोललो. नोटाबंदी, जीएसटी लागू करण्यामागील उद्देश चांगला असला तरी मार्ग चुकीचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. देशात कारभाराचा चिखल झाला आहे. केंद्र, राज्यात सत्ता पण सगळीकडे कारभार बेपत्ता असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या रोहिंग्या मुस्लिमांवरील भूमिकेचे समर्थन केले. हिंदुत्वाची संकल्पना देशात सत्यात उतरवण्यासाठी आम्ही राष्ट्रपतिपदासाठी भागवतांचे नाव सर्वात आधी सूचवले होते. आम्ही भागवतांचा नितांत आदर करतो, असे ते म्हणाले. वंदे मातरम् म्हणणार नाही, हवे तर आम्हाला देशाबाहेर काढा, असे नाकावर टिच्चून सांगणाऱ्यांना काय उत्तर देता. देशप्रेम काय असते ते तुम्ही आम्हाला शिकवू नका, अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले.

वेडा झालेला ‘विकास’ देशाला परवडेल का?: उद्धव ठाकरे

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसवरही टीका केली. आम्ही पाठिंबा उघडपणे देतो. तुमच्यासारखे अदृश्य हात देत नाहीत. आम्ही सत्तेत रममाण होत नाहीत, तर सत्ता राबवतो, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. याआधीही अनेकांनी प्रयत्न केले आणि संपले. तुम्हीही करून बघा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर तोफ डागली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. पण शेंडी आणि जानवेवाले हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. गायीला जपायचे आणि बीएचयूमध्ये ताईला झोडायचे असले हिंदुत्व आम्हाला नको. आमचे हिंदुत्व देशाशी निगडीत आहे. तुमच्या हिंदुत्वाची नेमकी व्याख्या काय आहे, असा सवालही त्यांनी भाजपला केला. हिंदुत्व फोडण्याचे काम भाजप करत आहे. पण हिंदुत्व फोडण्याचे पाप तुम्ही कराल तर तुमचे नशीबही फुटतील, असा इशाराही त्यांनी दिला. आपला लढा हा गोरगरिबांसाठी आहे. शिवसेनेने आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन पेटत राहणार आणि चिघळत राहणार, असेही सांगून निवडणुकांमध्ये भगवा फडकवा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

updates : 

निवडणुकांमध्ये भगवा फडकवून अच्छे दिन आणणार: उद्धव ठाकरे

लाटेत वाहून जातो तो ओंडका, पोहून जातो ते वीर सावरकर: उद्धव ठाकरे

आपला लढा गोरगरिबांसाठी: उद्धव ठाकरे

आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत: उद्धव ठाकरे

तुमच्या राजकारणासाठी हिंदुत्व फोडू नका, भाजपला सुनावले

विरोधकांमध्ये आंदोलने करण्याची हिंमत राहिली आहे का? : ठाकरे

काँग्रेस-राष्ट्रवादीने विश्वास गमावला आहे: उद्धव ठाकरे

मी बाळासाहेबांचा शिष्य, पवारांचा नाही: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांच्यावर तोफ

सत्तेत रमत नाहीत, सत्ता राबवत आहोत: उद्धव ठाकरे

देशभरात गायीला मारले की पाप, गोव्यात वेगळा न्याय का?: उद्धव ठाकरे

शेंडी, जानवेवाले हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही: उद्धव ठाकरे

तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय?; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

गायींबद्दल भाजपची भूमिका काय? : उद्धव ठाकरे

गायीला जपायचे आणि ताईला मारायचे असले हिंदुत्व आम्हाला नको: उद्धव ठाकरे

मुंबई विद्यापीठातील परीक्षांच्या निकालातील गोंधळावरून भाजपवर तोफ

शिवसेना संपवण्याचे स्वप्न बघणारे संपले: उद्धव ठाकरे

शिवसेना संपवण्याची स्वप्ने बघता?, ठाकरेंचा सवाल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हिंदुत्वाचा आवाज उठवला: उद्धव ठाकरे

काश्मीर, बिहारमध्ये भाजपने लाचारी पत्करली: उद्धव ठाकरे

आम्हाला तुमच्याकडून देशप्रेम शिकण्याची गरज नाही: उद्धव ठाकरे

नोटाबंदी, जीएसटी लागू करण्यामागील उद्देश चांगला असेल पण मार्ग चुकीचा: उद्धव ठाकरे

नोटाबंदीनंतर दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ : उद्धव ठाकरे

नोटाबंदी कशासाठी केली?: उद्धव ठाकरे

समान कर लावला असेल तर समान दर लावा: ठाकरे

हिंदू मते फुटू नयेत, यासाठी भाजपसोबत युती केली: उद्धव ठाकरे

जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी केले तरच तुमचे सरकार स्थिर राहणार:उद्धव ठाकरे

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने जोडून काय मिळणार?- उद्धव ठाकरे

मुंबईकरांच्या खांद्यावर बुलेट ट्रेनचे ओझे कशाला?

बुलेट ट्रेन म्हणजे फुकटचा नागोबा: उद्धव ठाकरे

शिवसैनिकच माझे शस्त्र: उद्धव ठाकरे

एल्फिन्स्टन दुर्घटनेतील बळींना शिवसेनेकडून श्रद्धांजली

शिवसैनिक अंगावर येणाऱ्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही: राऊत

मृत्यूची एक्स्प्रेस मुंबई, महाराष्ट्रात नको, जिथे घेऊन जायचे तिथे जा: राऊत

२०१९ मध्ये जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही: राऊत

बुलेट ट्रेन नव्हे, मृत्यूची एक्स्प्रेस: राऊत

ब्रिटीश टोपीवाले गेले आणि आता अहमदाबादी टोपीवाले आले: संजय राऊत

प्रत्येक शिवसैनिक कमांडो: संजय राऊत

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवतीर्थावर आगमन

शिवाजी पार्क येथील शिवसेना दसरा मेळाव्याला शिवसैनिकांची मोठी गर्दी