अभिनेत्री-निर्माती मुक्ता बर्वे यांच्या रसिका-अनामिका संस्थेतर्फे निर्मित ‘कोड-मंत्र’ या नाटकावर ‘लोकसत्ता संपादक शिफारशी’ची मोहोर उमटली आहे. आजवर मराठी व्यावसायिक रंगभूमीवर लष्कराशी संबंधित विषय केन्द्रस्थानी असलेले नाटक सहसा आलेले नाही. मिलिटरी कोर्टमार्शलवर आधारीत हे नाटक असून, लष्करी जवानांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहायचे की लष्करी शिस्तीच्या कर्तव्यकठोर भूमिकेतून, हा विवाद्य विषय या नाटकात प्रभावीरीत्या हाताळण्यात आलेला आहे. विषय, आशय, मांडणी, सादरीकरण, अभिनय, तांत्रिक बाजू अशा सर्वच पातळ्यांवर हे नाटक नित्याच्या पठडीबाज नाटकांपेक्षा अत्यंत आगळेवेगळे असे आहे. जवळजवळ चाळीसेक कलाकारांच्या संचातील हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करणे हे एक मोठेच आव्हान होते. मुक्ता बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते सहजगत्या आणि यशस्वीरीत्या पेलले आहे. अशा उच्च कलात्मक मूल्ये असलेल्या कलाकृतीच्या पाठीशी उभे राहणे आणि ती कलाकृती जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करणे हे ‘लोकसत्ता’ने नेहमीच आपले कर्तव्य मानलेले आहे. याच भूमिकेतून ‘कोड मंत्र’ या नाटकाची ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ योजनेत निवड करण्यात आली आहे.
अमेरिकी लष्करातील एका घटनेवर आधारीत ‘अ फ्यू गुड मेन’ हे नाटक अॅरॉन सॉर्किन या अमेरिकी लेखकानं १९८९ साली लिहिले आणि पुढे ते ब्रॉडवेवर सादर झाले. त्यावर नंतर याच नावाचा सिनेमाही निघाला. जगभरात अनेक भाषांतून या नाटकाचे प्रयोग सादर झाले आहेत. ‘कोड मंत्र’ हे नाटक ‘अ फ्यू गुड मेन’वर आधारीत असले तरी ते मराठीत आणताना त्याला भारतीय लष्कराची पाश्र्वभूमी दिली गेली आहे. सध्या गुजरातीतही हे नाटक गाजते आहे. नाटककार विजय निकम यांनी ‘कोड मंत्र’चे मराठी रूपांतर केले आहे. दिग्दर्शक राजेश जोशी यांनी लष्करी पेशातील बारीकसारीक तपशील, अस्सल वातावरणनिर्मिती, कर्तव्यपूर्तीच्या ध्यासात कधी कधी लष्कराकडून घडणारे अमानुष वर्तनव्यवहार, त्याची होणारी भयावह परिणती, तसेच गोपनीयता आणि कडक शिस्तीच्या नावाखाली त्यावर घातले जाणारे पांघरुण, त्यातून दडपली जाणारी मानवी मूल्ये असा सारा पट अत्यंत रेखीवपणे नाटकात साकारला आहे. यथार्थ पात्ररेखाटन हे या नाटकाचे आणखीन एक वैशिष्टय़. अभिनेत्री मुक्ता बर्वे यात प्रमुख भूमिकेत असून, त्यांना अजय पूरकर, मिलिंद अधिकारी, अतुल महाजन, उमेश जगताप आदी कलाकारांनी तोलामोलाची साथ दिली आहे.
प्रसाद वालावलकर यांनी उभारलेला सरहद्दीवरील लष्करी तळाचे वास्तवदर्शी नेपथ्य हे या नाटकाचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्टय़. सचिन जिगर यांचे संगीत, भौतेष व्यास यांची प्रकाशयोजना आणि अजय खत्री यांच्या वेशभूषेने ‘कोड-मंत्र’च्या निर्मितीमूल्यांमध्ये मोलाची भर घातली आहे. दिनू पेडणेकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे या नाटकाचे सहनिर्माते आहेत.
तिकिटात दहा टक्के सवलत
‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या ‘कोड मंत्र’च्या जाहिरातीचे पान सोबत घेऊन गेल्यास ३१ ऑक्टोबपर्यंतच्या नाटय़प्रयोगांना ‘लोकसत्ता’च्या वाचकांना तिकिटात दहा टक्के सवलत मिळणार आहे. सामाजिक आणि खासगी संस्थांना दिलेल्या ‘कोड मंत्र’च्या प्रयोगांच्या वेळी मात्र ही सवलत मिळणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.