रसिकांचे प्रेम आणि समीक्षकांचा गौरव हे दोन्ही कमावणारी प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याबरोबर मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम ‘व्हिवा लाउंज’च्या माध्यमातून आज ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. चित्रपट आणि रंगभूमी या दोन्हीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मुक्ता या निमित्ताने प्रेक्षकांशी थेट संवाद साधेल. रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे या कार्यक्रमाच्या प्रवेशिका पहिल्या दिवशीच संपल्या. कार्यक्रमाला येताना या प्रवेशिका आवश्यक आहेत. ‘व्हिवा लाउंज’ची मैफल ठाण्यात प्रथमच रंगणार आहे.
नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका या सर्व माध्यमांतून लीलया वावरणाऱ्या मुक्ताने आता ‘छापा काटा’ या नाटकातून निर्माती म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ‘देहभान’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘फायनल ड्राफ्ट’ आणि आता ‘छापा काटा’सारख्या आशयघन नाटकांमधून तिने आपल्या चतुरस्र अभिनयाची चुणूक दाखवली. ‘जोगवा’ चित्रपटातली सुली, ‘मुंबई- पुणे – मुंबई’तील मुंबईची मुलगी, ‘एक डाव धोबीपछाड’मधली सुलक्षणा अशा विविधरंगी भूमिका मुक्ताच्या नावावर आहेत.
दूरचित्रवाणी मालिकांमध्येही तिच्या भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. ‘अग्निहोत्र’मधली तिची मंजुळा आणि ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधली राधा अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. पुण्याच्या ललित कला केंद्रातून नाटय़शास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत रुळलेल्या मुक्ताचे अनुभव ‘व्हिवा लाउंज’च्या मंचावरून तिच्याकडूनच ऐकायला मिळणार आहेत.
ठाण्यातील प्रसिद्ध ‘टिपटॉप प्लाझा’ या कार्यक्रमाचे व्हेन्यू पार्टनर आहेत. ‘झी २४ तास’ ही वाहिनी टेलिव्हिजन कार्यक्रमाची प्रायोजक असून ‘व्हिवा लाउंज’ची ही गप्पांची मैफल झी २४ तास वाहिनीवर शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रक्षेपित केली जाईल.
कधी : आज, शुक्रवार, ७ मार्च
कुठे : टिप-टॉप प्लाझा, लालबहादूर शास्त्री मार्ग, ठाणे (पश्चिम)
वेळ : दुपारी ३.४५ वाजता
टीव्ही प्रक्षेपण : शनिवारी सायं. ५ वा., झी २४ तासवर
प्रवेश फक्त प्रवेशिकाधारकांनाच
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
मुक्त संवाद.. मुक्ता बर्वेशी!
रसिकांचे प्रेम आणि समीक्षकांचा गौरव हे दोन्ही कमावणारी प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याबरोबर मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम ‘व्हिवा लाउंज’च्या माध्यमातून आज ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे.

First published on: 07-03-2014 at 02:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta viva lounge with mukta barve in thane today