‘लव्ह जिहाद’ म्हणजे नेमके काय हे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना माहीत नसले, तरी महाराष्ट्राचे राष्ट्रवादी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पोलीस दल मात्र त्याबाबतीत अतिशय हुशार आहे. त्यांना केवळ या शब्दाचा अर्थच माहीत आहे असे नाही, तर राज्यात तशी किती प्रकरणे घडली आहेत याचीही बित्तंबातमी आहे. राज्य पोलिसांनी माहितीच्या अधिकारात तसे कबूलच करून टाकले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काही हिंदूुत्ववादी संघटनांनी ‘लव्ह जिहाद’वरून वादंग माजवले आहे. मात्र त्याबाबत केवळ केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले असे नाही, तर त्याची नेमकी व्याख्या काय असे विचारून तो मुद्दाच उडवून लावला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही ही प्रसारमाध्यमांचीच निर्मिती आहे असे सांगत तसे वास्तव नसल्याचे स्पष्ट केले. असे असताना महाराष्ट्र पोलिसांनी मात्र राज्यात असे प्रकार घडत असल्याचे सांगत ‘लव्ह जिहाद’ नामक प्रकार अस्तित्वात असल्याचेच मान्य केले.
हिंदू जनजागृती समितीने याबाबत पोलीस महासंचालकांकडून माहिती मागविली होती. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या स्वाक्षरीने त्या अर्जाला उत्तर देण्यात आले. त्यात ‘राज्यातील लव्ह जिहादची प्रकरणे’ अशा सुस्पष्ट उल्लेखाने आकडेवारी देण्यात आली. हिंदू जनजागृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ती जाहीर केली. त्याबाबत विचारणा केल्यानंतर मात्र देवेन भारती यांनी ही केवळ प्रसारमाध्यमांत गाजलेली हिंदूू-मुस्लिम वादग्रस्त विवाहांची आकडेवारी असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आम्ही ‘लव्ह जिहाद’ नावाने कोणतीही आकडेवारी गोळा करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader