भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील वास्तव्य राहिलेले घर ३१ कोटी रुपयांना खरेदी करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. घरमालकाला तसे पत्र पाठवून कळविण्यात आले आहे. त्यानुसार ही सारी प्रक्रिया ४ सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
लंडनमधील आंबेडकर निवास खरेदी करून त्याचे स्मारकात रूपांतर करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर आणि त्यासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतरही, राज्य सरकाकडून निश्चित असा प्रस्ताव विशेषत: किमतीबाबत काहीच कळविले जात नसल्यामुळे घरमालकाने सोमवापर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत अंतिम निर्णय कळविला नाही, तर ही वास्तू एका धर्मादाय संस्थेला विकली जाईल, असे राज्य सरकारला सांगण्यात आले. त्यानंतर वेगाने हालचाली झाल्या आणि दोन दिवसांत खरेदी करार करून ४ सप्टेंबपर्यंत घर ताब्यात घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे घरमालकाला कळविण्यात आले.
घराची किंमत ठरविण्याकरिता दोन कंपन्यांची नियुक्ती केली होती. एका कंपनीने २९ कोटी रुपये किंमत निश्चित केली होती व दुसऱ्या कंपनीने ३० कोटी रुपयांचे मूल्यांकन केले होते, परंतु घरमालकाची ३१ कोटींची मागणी असल्याने त्याबाबतचा निर्णय होत नव्हता. त्याचबरोबर वित्त विभागानेही घर खरेदी प्रक्रियेत केंद्र सरकारचा सहभाग घ्यावा, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याने पुढील प्रक्रिया थंडावली होती. या संदर्भात बडोले यांनी २९ ऑगस्ट १९८० च्या अधिसूचनेचा हवाला देऊन परदेशातील मालमत्ता खरेदीचे राज्य सरकारला अधिकार आहेत, असे सांगून वित्त विभागाने उपस्थित केलेला तांत्रिक मुद्दा निर्थक असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सूचित केले. मुख्यमंत्र्यांनी घर खरेदी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे आता कोणताही घोळ नाही. घरमालकाने मागणी केल्याप्रमाणे ३१ कोटी रुपयांना ही वास्तू खरेदी करण्याची राज्य सरकारने तयारी केली आहे. लंडनमधील भारतीय उच्च आयुक्तालयामार्फत तसे कळविण्यात आल्याचेही बडोले यांनी स्पष्ट केले.
आंबेडकर निवास खरेदी करण्यासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वित्त विभागाकडून ती फाईल अडविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
– सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री