‘सत्यकथा’ आणि ‘मौज’ या दोन वाङमयीन नियतकालिकांद्वारे मराठी साहित्य क्षेत्रात साक्षेपी संपादनाचा मापदंड निर्माण करतानाच अनेक साहित्यिक ‘घडविणारे’ ज्येष्ठ संपादक राम पटवर्धन यांचे मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, अनिरूद्ध, श्रीरंग ही मुले, सुन आणि नात ऋजुता असा परिवार आहे.
नवे प्रवाह आणि प्रयोग यांद्वारे मराठीची रूळलेली वाट बदलणारे आणि घाट सुघड करणारे संपादक म्हणून राम पटवर्धन यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. वेळोवेळी शिष्यवृत्त्या मिळवून मराठीत एमए केलेल्या पटवर्धन यांनी पुढच्या काळात मराठीतील अनेक नवलेखक घडविले, अनेकांच्या प्रतिभेला पैलू पाडून मौजेच्या पुस्तकांतून ते वाचकांसमोर आणले. प्रारंभी काही काळ त्यांनी मंत्रालयाती नोकरी केली. पण सरकारी खाक्यामध्ये रमणे त्यांच्या स्वभावात नव्हते. काही महिन्यांतच त्या नोकरीचा राजीनामा देऊन ते मौज प्रकाशनगृहात रूजू झाले. मराठी वाङ्मयीन क्षेत्रात दंतकथेचे स्वरूप प्राप्त झालेल्या ‘सत्यकथा’मध्ये आधी ते कार्यकारी संपादक आणि नंतर मुख्य संपादक होते. जया दडकर, मारूती चितमपल्ली, अनिल अवचट, नारायण सुर्वे, आशा बगे, सानिया , विलास सारंग, यशवंत पाठक, मीना प्रभू आदी मराठीतील अनेक नामवंत साहित्यिकांची पुस्तके त्यांनी संपादित केली. ‘मौज’मधून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन केले.
अचला जोशी यांचे ‘आश्रम नावाने घर’ हे त्यांनी संपादित केलेले अखेरचे पुस्तक. संपादनाबरोबरच त्यांनी अनुवादित केलेली ‘पाडस’ आणि ‘योगदीपिका’ ही दोन पुस्तकेही वाचकप्रिय ठरली. ‘पाडस’ तर भाषांतराचा उत्तम नमुना म्हणून ओळखले जाते. ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमागील आनंदपार्क संकुलात १९९८ पासून ते मुला-नातवंडांसमवेत राहात होते. येथील जवाहरबाग स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. ‘मौज’ प्रकाशनगृहाचे संजय भागवत, चित्रकार ज्योत्स्ना कदम, कवी अरूण म्हात्रे आदी याप्रसंगी उपस्थित होते.