मुंबईच्या घाटकोपर (प) मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) आमदार राम कदम यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पुण्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे उपस्थित होते. 
राम कदम यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून घाटकोपर(प) मतदारसंघावर स्वत:ची चांगली पकड निर्माण केली आहे. विधानसभा परिसरात वाहतूक पोलीस शाखेतील अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना केलेल्या मारहाण प्रकारानंतर राज ठाकरे आणि राम कदम यांच्यात वितुष्ट आले होते. डॅशिंग आमदार म्हणून ओळख असणारे राम कदम गेल्या काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज होते. राम कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे या मतदारसंघात मनसेला फटका बसण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तविली आहे.