बाबू गेनू इमारतीच्या दुर्घटनेप्रकरणी शिवडी पोलिसांनी अशोक मेहता (४५) या मंडप डेकोरेटरला अटक केली आहे. तळमजल्यावरील खांब तोडून त्याने पोटमाळे बनविल्याचे चौकशीत समोर आले आहे. मेहता याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  अशोक मेहता याचे या इमारतीच्या तळमजल्यावर डेकोरेटर्सटे गोदाम होते. सामान ठेवण्यासाठी त्याने खांब तोडून पोटमाळे बनविल्याने इमारतीचा आधार कमकुवत होऊन ही दुर्घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मेहता याला शनिवारी सकाळी शिवडी पश्चिमेच्या टी जे रोड वरील अश्वा गार्डन या त्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात पुरावे गोळा करत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक पंढरी कांडे यांनी सांगितले. पालिकेने इमारत धोकादायक असल्याचे २००९ साली दिलेले पत्र, रहिवाशांचे जबाब पोलीस नोंदविणार आहेत. याशिवाय ढिगाऱ्याचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. याप्रकरणात आणखी कुणी दोषी असतील तर त्यांनाही चौकशीनंतर अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. मेहता याने अनधिकृत पद्धतीने बांधकाम केले होते. त्या कामगारांना शोधून त्यांचाही जबाब नोंदविला जाणार आहे. दरम्यान मेहता याला न्यायालयात आणले तेव्हा त्याला प्रसारमाध्यांपासून दूर ठेवण्याची पुरेपूर खबरदारी शिवडी पोलिासांनी घेतली. त्याची छबी कॅमेऱ्यात टिपली जाऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी सापडलेल्या वस्तूंचा पंचनामा अद्याप करण्यात आलेला नाही.