शहरात पाऊस धो धो कोसळत असतानाही पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्राकडे मात्र पावसाने सुरुवातीला पाठ फिरवली होती. मात्र रविवारी सुरू झालेला मुसळधार पाऊस व त्यानंतरच्या मध्यम स्वरूपाच्या सरी यामुळे तलावांत पाच दिवसांत ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला. गेल्या वर्षीचा उर्वरित साठा व आताचा पाऊस यामुळे शंभर दिवसांना पुरेल एवढे पाणी तलावात आहे.
शहराला ठाणे-नाशिक या क्षेत्रातील वैतरणा व भातसा क्षेत्रांमधील पाच धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. ११ जूनपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली असली तरी तलावांमध्ये पाऊस पडत नसल्याने आणि रोज शहराला केल्या जाणाऱ्या सुमारे साडेतीन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठय़ामुळे पाण्याचा साठा कमी झाला होता. २१ जून रोजी तो सर्वात कमी पातळीवर म्हणजे एक लाख ८४ हजार दशलक्ष लिटपर्यंत खाली आला. त्या वेळी मुंबईतील पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र पाऊस उत्तरेला सरकल्यामुळे तलावात भरपूर पाऊस पडला. सोमवारी एका दिवसात तलावातील साठा १० हजार दशलक्ष लिटरने वाढला. शुक्रवारी, २६ जून रोजी सर्व तलावातील एकूण पाणीसाठा ३ लाख ३२ हजार ६४७ लिटर झाला.
या वर्षीच्या तुलनेत २०१३ मध्ये तलावक्षेत्रात अधिक पाऊस होऊनही या दिवसापर्यंत तलावातील पाणीसाठा ३ लाख २४ हजार ५३९ दशलक्ष लिटर होता. आधीच्या वर्षांत पाणी अधिक वापरले गेल्याने तलावातील पातळी कमी झाली होती.

तलावांतील पाणीसाठा
* मोडकसागर – ७२,३३०
दशलक्ष लिटर
*मध्य वैतरणा – १,१९,६९५ दशलक्ष लिटर
* भातसा – ९७,८७६ दशलक्ष लिटर
* तानसा – २९,८४१ दशलक्ष लिटर
* विहार – ८,००२ दशलक्ष लिटर
* तुळशी – ४,९०२ दशलक्ष लिटर
* अप्पर वैतरणा – ० दशलक्ष लिटर
* अप्पर वैतरणा येथे आतापर्यंत तब्बल ६१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र या तलावातील पाणीसाठा यापूर्वी पूर्ण वापरला गेला आहे. जलवाहिन्यांपेक्षा पाण्याची पातळी खाली गेल्याने पाणीसाठा शून्य धरण्यात आला आहे.

Story img Loader