भाईंदरहून सुटलेली लोकल रविवारी सकाळी चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक तीनमध्ये अवरोधक भेदून थेट फलाटावर चढली. गाडी चर्चगेट स्थानकाच्या इमारतीपासून फक्त दोन फूट अंतरावर थांबली.  या घटनेत पाच प्रवासी आणि मोटरमन किरकोळ जखमी झाले. दरम्यान, अपघातामुळे दिवसभरात ७० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामंजस्य करार करीत असताना चर्चगेट स्थानकात मात्र रेल्वेच्या इतिहासातील ‘न भूतो (कदाचित) न भविष्यति’ असा अपघात झाला. भाईंदरहून चर्चगेटच्या दिशेने येणारी गाडी रविवारी सकाळी ११.२० वाजता चर्चगेट स्थानकात शिरली. नेहमीप्रमाणे या गाडीचा वेग कमी झाला नाही आणि काही क्षणांतच ही गाडी स्थानकाच्या शेवटी असलेल्या अवरोधकांवर आपटली. ती  एवढय़ावरच थांबली नाही. गाडी अवरोधक भेदून थेट फलाटावर चढली आणि तब्बल २० ते ३० फूट अंतर पुढे गेली. त्यानंतर चर्चगेट स्थानक इमारतीच्या अगदी दोन फूट अंतरावर गाडी थांबली. या प्रकारामुळे स्थानकावरील अनेक प्रवासी घाबरले. गाडीतील प्रवाशांनाही चांगलाच हादरा बसला. दरम्यान, डबा हलविण्याचे काम सुरू असताना डब्याचा ट्रान्सफॉर्मर अडकल्याचे निदर्शनास आले. तो काढण्याची प्रक्रिया खूप अवघड असल्याने रात्री उशीरापर्यंत या कामात रेल्वे प्रशासनाला यश आले नव्हते. तरीही प्रवाशांना याचा फटका बसू न देण्याचा प्रयत्न असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांनी स्पष्ट केले.

गाडीचा वेग कमी न होणे. ती फलाटाच्या शेवटी जाऊन आदळणे, ही गंभीर बाब आहे. प्रथमदर्शनी या अपघातामागे हलगर्जी  दिसून येत आहे. मोटरमन तिवारी, गार्ड अजय गोहील आणि लोको निरीक्षक यांना तातडीने निलंबित केले आहे.
    – ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद, महाव्यवस्थापक (पश्चिम रेल्वे)

जखमींची नावे
वृंदा चव्हाण (४२), भारती कांबळे (५०), रमेश सी. (५२), अनिता प्रशांत (२५) आणि मोहम्मद फरीद मन्सुरी (२८). यापैकी पहिल्या तीन प्रवाशांना रेल्वे स्थानकातच प्रथमोपचार देऊन घरी सोडले.

 

Story img Loader