भरधाव गाडीची ब्रेक यंत्रणा निकामी झाल्यास तिचा वेग रोखण्याचे काम फलाटाच्या एका टोकाला बसवलेले हायड्रॉलिक बफर करीत असतात, पण रविवारी चर्चगेट स्थानकात शिरलेल्या लोकलने बफरही तोडून थेट फलाट गाठले. हे असे का झाले, यावरून सध्या रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी संभ्रमात आहेत. चर्चगेट स्थानकात गाडी शिरताना ताशी ३० ते ४० किमी अशी वेगमर्यादा असते. परंतु या अपघातात वेगमर्यादेचेही उल्लंघन झाल्याची शक्यता काही अधिकारी व्यक्त करीत आहेत.
भाईंदरहून सुटलेली ही गाडी मरीन लाइन्स स्थानकापर्यंत व्यवस्थित आली. ही गाडी ११ वाजून २० मिनिटांनी चर्चगेट स्थानकात फलाट क्रमांक तीनवर आली. त्या वेळी या गाडीचा वेग ३६ किमी प्रतितास एवढा होता. लोकल बफरला धडकली त्या वेळी ११ वाजून २० मिनिटे आणि ४७ सेकंद झाले होते. लोकलचा वेग ताशी २९ किमी एवढा होता. लोकल बफरला धडकून फलाटावर चढल्यावर गाडीचा वेग ताशी १९, ११, सहा आणि शेवटी तीन किमी. असा कमी होत ती अखेर थांबली. फलाटात गाडी शिरताना तिचा वेग मर्यादेप्रमाणे ताशी ३० किमीपर्यंतच असायला हवा होता, मात्र तो ताशी ३६ किमी. एवढा होता. त्यामुळे ती शिरण्याच्या आधीच तिच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकलला इलेक्ट्रो-न्युमॅटिक आणि एअर ब्रेक असतात. अनेकदा दोन वायरमधील संपर्क तुटल्याने इलेक्ट्रो-न्युमॅटिक ब्रेक प्रणाली काम करीत नाही. त्या वेळी एअर ब्रेकचा वापर केला जातो. या अपघाताच्या वेळी एअर ब्रेकचा वापर झाला असता, तर गाडी थांबविण्यात यश आले असते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ब्रेक निकामी झाल्यानंतरही वेग रोखण्यासाठी फलाटाच्या टोकाला हायड्रॉलिक बफर असतात. ३० किमी हा वेग या बफरसाठी जास्त मानला जात नाही. गाडी बफरवर आदळल्यानंतर ती मागे सरकून जागीच थांबणे अपेक्षित होते. मात्र या अपघातात बफरही उखडले गेले. त्यामुळे वेगाचा अंदाज येत नाही.
वेगमर्यादेचेही उल्लंघन
भरधाव गाडीची ब्रेक यंत्रणा निकामी झाल्यास तिचा वेग रोखण्याचे काम फलाटाच्या एका टोकाला बसवलेले हायड्रॉलिक बफर करीत असतात..
First published on: 29-06-2015 at 01:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train crashes speed matters