तीन पोलीस अधिकाऱयांनी पोलीस ठाण्यातच बलात्कार केल्याचा आरोप करणाऱया पीडित मॉडेलने अखेर मौन सोडून झालेल्या घटनेची सविस्तर माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली. मॉडेल तरुणीवर तीन पोलिसांनी पोलीस ठाण्यातच अत्याचार करून तिच्याकडील मौल्यवान ऐवज आणि रोख रक्कम लुटली. या प्रकरणी मॉडेलने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिल्यानंतर दोन पोलिसांसह सहा जणांवर बलात्कार, विनयभंग आणि लुटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घृणास्पद घटनेमुळे आत्महत्या करण्याचा निर्णय देखील मनात डोकावल्याचे तिने सांगितले. मात्र, आता मोठ्या हिंमतीने या प्रकरणाचा अगदी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार तिने केला आहे. अंगावर शहारा आणणाऱया या घटनेची पीडित मॉडेलने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेली सविस्तर माहिती…  
अभिनेत्री व्हायचे स्वप्न बाळगून मुंबईत आलेली ‘ती’ म्हणाली की, “मला स्टार व्हायचे होते परंतु, या घटनेने आता आयुष्यच बदलून गेले आहे. त्यामुळे मी माझ्या कन्सल्टन्सी व्यवसायात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.” पीडित मॉडेल मूळची चंदीगडची असून हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन विषयात तिने पदवीग्रहण केली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमध्येही तिने या क्षेत्रात काम केले आहे. मात्र, अभिनेत्री व्हायच्या इच्छेने ती ऑगस्ट २०१४ साली मुंबईत आली होती. गुजरातच्या एका व्यावसायिकाने माझे फोटो पाहून चित्रपटात काम करण्याचे ऑफर दिली होती. त्यासाठी एका हॉटेलमध्ये येण्यास सांगितले मात्र, रात्र झाल्याने ही भेट दुसऱया दिवशी सकाळी ठेवावी अशी विनंती केली होती. पण त्याने तू आत्ताच भेट घेतली पाहिजेस असा आग्रह धरला आणि मला जावे लागले. त्याने मला त्याच्या खोलीत बोलावले तेव्हा मला संशय आला आणि मी नकार दिला. त्वरित आपल्या एका मित्राला फोन करून परिस्थितीची माहिती दिली. त्याने मला,‘तू ताबडतोब हॉटेलमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला व १५ ते २० मिनिटांत मी तुला घ्यायला येतोय,’ असेही सांगितले. मी ताबडतोब बाहेर पडले व माझा मित्र स्कूटरवर तेथे आला. आम्ही निघणार तोच साध्या कपड्यांतील काही लोक एका महिलेसह आमच्याजवळ आले आणि आम्ही पोलीस आहोत असे सांगून येथे धाड पडली असल्याचे सांगितले. वेश्याव्यवसायाशी तुम्ही निगडीत असल्याचासारखा उल्लेख करत पोलीसांनी आम्हाला जबरदस्ती पोलीस ठाण्यात नेले.
पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यानंतर आपण प्रतिष्ठीत कुटुंबातील असून घरी माझा १७ वर्षांचा भाऊ माझी वाट बघत आहे. माझा भाऊ सुटीनिमित्त मुंबईत आला असून त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ एप्रिल रोजी परत जायचे आहे.’ परंतु तो अधिकारी मी वेश्या असल्याचेच सांगत होता व माझा मित्र वेश्या धंद्यातील दलाल आहे, असे म्हणत होता. त्यांनी आमचे अजिबात ऐकून घेतले नाही. त्यातील एका अधिकाऱयाने माझ्याकडील ऑस्ट्रेलियातील ओळखपत्रपाहून तुझ्याकडे तर भरपूर पैसे असतील अशी विचारणा केली. यानंतर त्यांनी सतत माझ्याकडे पैशांची मागणी केली. स्वत:ला पोलीस अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या एका महिलेने माझ्या अंगावरील दागिने काढून घेऊन माझ्या बॅगेची तपासणी केली. त्यानंतर एका अधिकाऱ्याने संघर्ष पोलीस चौकीत मला नेले. एकदा आतमध्ये आल्यानंतर अधिकाऱयाने दोन्ही खोल्या आतून बंद करून घेतल्या व तो माझा तीव्र विरोध असतानाही माझ्या अंगावर पडू लागला. ‘तू मला खुश केले तर मी तुला सोडून देईन’, असेही तो मला म्हणाला. तो माझ्या अंगाला आक्षेपार्ह पद्धतीने हात लावू लागला व त्याचे सहकारी दार वाजवू लागले की तो ‘त्यांना अजून थोडा वेळ थांबा’, असे सांगायचा. हा सगळा प्रकार जवळपास तासभर चालला व नंतर त्याने दार उघडले.

दरम्यान, तिच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक खटापे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि पोलीस हवालदार कोडे यांच्यासह सहा जणांवर बलात्कार, विनयभंग आणि लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. या प्रकरणाचा तपास त्वरित गुन्हे शाखा १० कडे सुपूर्द करण्यात आला आहे.

Story img Loader