चांगल्या वातावरणात उगाच खेचाखेची करू नका, प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोमवारी केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटचा तिसरा भाग सादर करताना ते बोलत होते. शिवसेनाप्रमुख असताना शिवसेना १७१ आणि भाजप ११७ असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. यंदाच्या निवडणुकीसाठी मी माझी भूमिका भाजपपुढे मांडली आहे. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे, तोपर्यंत नकारात्मक काहीही बोलण्याची इच्छा नाही असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. तसेच २५ वर्षांची युती तुटावी असे मनापासून वाटत नाही, त्यामुळे लवकरच तोडगा निघेल अशी आशाही उध्दव यांनी यावेळी व्यक्त केली.महाराष्ट्रात मोदी लाटेबाबत कोणतेही खोटे वक्तव्य केलेले नाही. मनातले नाही, जे वास्तव आहे ते बोललो. मोदी पंतप्रधान व्हावेत हीच शिवसेनेची भूमिका होती. त्यामुळे मोदींविरोधात बोलण्याच प्रश्नच निर्माण होत नाही, असंही ते म्हणाले.उध्दव ठाकरे यांनी ‘अशा अनेक लाटा आम्ही पाहिल्या, मोदी यांची लाट अन्य राज्यात नव्हती. लोकसभेच्या विजयात शिवसेनेचाही महत्वाचा वाटा आहे’, असं स्पष्ट मत व्यक्त केल्याचं उध्दव म्हणाले. शिवसेनेशी जागावाटपाची बोलणी करण्यास भाजप कार्यकर्ते नकार देत असल्याच्या माधव भंडारी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यासही यावेळी उध्दव ठाकरेंनी टाळले.
दरम्यान, शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटच्या तिसऱया टप्प्यात वीज नसताना चालणाऱया कृषीपंपाचे सादरीकरण उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात आले. उपकरणे जरी साधी असली तरी शेतकऱयांच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहेत आणि महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या विकासावरच राज्याचा विकास अवलंबून असल्याने याकडे विशेष लक्ष देण्यास पक्ष आग्रही असल्याचे उध्दव म्हणाले