‘गर्दीच्या वेळी स्वत:चा जीव धोक्यात टाकून रेल्वेच्या टपावरून प्रवास करू नका’, अशी उद्घोषणा मध्य रेल्वेने वारंवार करूनही केवळ ‘स्टंटबाजी’पोटी टपावर चढणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी मध्य रेल्वेचे मोठे नुकसान केले आहे. डीसी-एसी परिवर्तन झाल्यानंतर २५,००० वोल्ट एवढय़ा प्रचंड विद्युतप्रवाहापुढे या टपावरच्या प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित करत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या परिवर्तनाचा मुहूर्त लांबणीवर टाकला आहे. एसी प्रवाहामुळे दर दिवशी रेल्वेचे एक कोटी रुपये वाचणार आहेत. परिणामी हे टपावरील प्रवासी रेल्वेला तापदायक ठरत आहेत.
कल्याण ते लोकमान्य टिळक टर्मिनस या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर डीसी-एसी परिवर्तन १० नोव्हेंबपर्यंत होणे अपेक्षित होते. मध्य रेल्वेने त्यासाठी शनिवारी रात्री खास मेगाब्लॉकही नियोजित केला होता. मात्र कोणताही प्रकल्प सुरू करण्याआधी रेल्वे सुरक्षा आयोगाकडून त्याची पाहणी केली जाते. हा प्रकल्प प्रवाशांसाठी सुरक्षित आहे की नाही, हे या पाहणीत तपासले जाते. गेल्या आठवडय़ात रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ही पाहणी करून मौखिक मान्यता दिली होती. मात्र अचानक टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा काढत हा मेगाब्लॉक घेण्यासाठी लाल कंदील दाखवला.
टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मध्य रेल्वे काय पावले उचलत आहे, हे आधी स्पष्ट करावे. त्यानंतरच डीसी-एसी परिवर्तनाला मान्यता देण्यात येईल, असा पवित्रा रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतला आहे. त्यांनी हे प्रकरण त्यांच्या वरिष्ठांकडे लखनऊला पाठवून दिल्याने तेथून मान्यता मिळेपर्यंत मध्य रेल्वेला हातावर हात ठेवून बसावे लागणार आहे.
मध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवा थेट विद्युतप्रवाहावर (डीसी) चालणारी देशातील एकमेव सेवा आहे. या मार्गावर एसी प्रवाह सुरू करण्यासाठी गेली दोन वर्षे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी १२९९ कोटी रुपयांची तरतुदही केली आहे. सध्या कल्याणच्या पुढे कसारा आणि कर्जत हे दोन्ही मार्ग एसी प्रवाहावर चालत आहेत. तर कल्याण ते ठाणे या टप्प्यातील चारही मार्गावर एसी विद्युतप्रवाह आहे. यासाठी आतापर्यंत ९१० कोटी रुपयांचा खर्चही मध्य रेल्वेने केला आहे.
टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मध्य रेल्वे काय पावले उचलत आहे, हे आधी स्पष्ट करावे. त्यानंतरच डीसी-एसी परिवर्तनाला मान्यता देण्यात येईल, असा पवित्रा रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतला आहे.
डीसी-एसी परिवर्तनाचे फायदे
*एसी विद्युतप्रवाहामुळे गाडय़ांचा वेग वाढणार आहे. वेळेची बचत होणार आहे.
*मध्य रेल्वेला विजेपोटी येणाऱ्या खर्चात कपात होणार आहे.
*एसी विद्युतप्रवाहावर धावणाऱ्या गाडय़ांचा देखभाल खर्चही कमी असल्याने त्यातही मध्य रेल्वेला फायदा होणार.
*हा फायदा पैशांमध्ये मोजायचा झाल्यास दर दिवशी तब्बल एक कोटी रुपये एवढय़ा फायद्यापासून मध्य रेल्वे वंचित आहे.