आई-वडीलांचे डोक्यावर नसलेले छत्र..सोबत होती ती मानलेल्या वृद्ध आजीची आणि गरिबीची..जगायाचे कसा हा प्रश्न त्या १४ वर्षीय मुलापुढे होता. यातूनच तो गुन्हेगारीकडे वळला. लहानमोठय़ा चोऱ्या करून त्याचे आणि आजीचे पोट भरत असे. काही दिवसापूर्वी नेरूळ पोलिसांनी चोरी करताना त्याला पकडले. साडेचार तोळ्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत केले. त्याला बालन्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याची बाजू ऐकून घेत त्याला सुधारण्याची एक संधी दिली. मात्र चोरी करायची नाहीतर पोट कसे भरायचे या विंवचेत असलेल्या त्या मुलाने आजीसह नेरूळ पोलीस ठाणे गाठले. येथेच त्याच्या नवीन आयुष्याला सुरूवात झाली. पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिता शिंदे -अन्फासो यांनी त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला आहे.
मोठेपणी शासकीय अधिकारी व्हायचे असे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाला नियतीने चोरीकडे वळविले. नेरूळमधील अनेक घरांमधील दागिने त्यांने लांबवले. त्याने चोरून आणलेल्या दागिन्याची विक्री त्याची आजी करत होती. यातून मिळणाऱ्या पैश्यातून त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. मात्र काही दिवसांपूर्वी गस्तीवर असलेल्या नेरूळ पोलिसांच्या हाती तो लागला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता नेरूळमधील दोन घरफोडींची कबुली त्याने दिली. न्यायालयाने मानवतेच्या दृष्टीकोनातून त्याची सुटका केली, तरी जगण्याचा प्रश्न त्यापुढे होताच. मग तो आजीसह नेरूळ पोलीस ठाण्यात आला. तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता शिंदे यांनी त्याला पाहिले. त्याची आपुलकीने विचारपूस त्यांनी केली असता, त्यांच्यापुढे जगण्याचा व्यथा त्याने मांडली. तू पुढे शिकणार का, या त्यांच्या प्रश्नाने तो चमकला. त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी त्यांनी दर्शवली. अट मात्र इतकीच होती की, गुन्हेगारीचा मार्ग तो पुन्हा अवलंबणार नाही. त्यानेही त्यांना पुन्हा चोरी करणार नाही, असे आश्वासन दिले. हा संवाद ऐकत असतानाच त्याच्या आजीच्या सुरकुतलेल्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू तरळत होते.
परिस्थितीने त्याला गुन्हेगारीकडे वळविले होते. यातून त्याला बाहेर काढण्याची गरज होती. अत्यंत हूशार आणि तंत्रज्ञानातील विषयातील त्याच्याकडे असलेल्या माहितीने आम्हाला सर्वाना चकीत केले. गुन्हेगारी मार्ग सोडून त्याने पुढे शिकावे यासाठी समुपदेशन केल्यानंतर त्याने शिक्षण घेण्याची तयारी दर्शवली. त्याच्या सातवीच्या प्रवेशासाठी नेरूळमधील तेरणा विद्यालयाशी बोलणे सुरू आहे. त्याच्या शाळेचा आणि त्यासाठी लागणारे पुस्तक आणि इतर साहित्याचा खर्च आम्ही उचलणार आहोत.
– अनिता शिंदे-अन्फासो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक