मुंबईसह देशभरात हीच परिस्थिती; प्रवासी सुरक्षा धोक्यात..
रेल्वेचा श्वास असलेले रूळ तुटण्याच्या प्रकारांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे ही स्थिती केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशभर असल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. वर्षभरापूर्वी रेल्वे रूळ तुटून कल्याण येथे एक एक्स्प्रेस गाडी घसरली होती. त्यानंतर केलेल्या चाचणीत हा रूळच सदोष असल्याचे आढळले होते. एकटय़ा मुंबई विभागात दर तीन दिवसांआड रूळ तुटत असल्याचे अधिकृतरीत्या सांगितले जात आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण दिवसाला तीन ते पाच एवढे असल्याचे समजते.
रेल्वे गाडय़ांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी रूळ मजबूत आणि सुयोग्य स्थितीत असणे अत्यंत गरजेचे असते. गेल्या काही वर्षांत रूळ जागेवर ठेवण्यासाठी लागणाऱ्या फिशप्लेट्स, स्लिपर्स यांचा दर्जा चांगलाच सुधारल्याने गाडी रुळावरून खाली
उतरण्याच्या घटना कमी झाल्याचे सांगितले जाते. मात्र याच वेळी रूळ तुटण्याच्या घटनांची आकडेवारी बघितली असता भयावह वास्तव समोर येत आहे. भारतीय रेल्वेला रुळांचा पुरवठा करण्याचे काम केवळ भिलाई पोलाद कारखान्यातून केले जाते. २००५मध्ये या कारखान्यातून पुरवलेल्या रुळांमध्ये हायड्रोजनचा एक घटक नसल्याने ते रूळ सदोष असल्याचे आढळले होते. मात्र त्याबाबत पुढे काहीच कारवाई झाली नसल्याचे समोर येत आहे. अजूनही याच कारखान्यातून रूळ पुरवठा होत असल्याने त्यांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गाडीतील बिघाडावरून दुरुस्ती कामगारांवर कारवाई होते. विलंबाबद्दल मोटरमन-गार्ड यांच्यावर कारवाई होते. मग या न्यायाने सदोष रेल्वे रूळ पुरवणाऱ्या भिलाई पोलाद कारखान्यावर आणि हे रूळ सेवेत घेताना तपासणीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही?
-वेणू नायर, महामंत्री, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन
रेल्वेची ताटातूट..
एकटय़ा मुंबई विभागात एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत रूळ तुटण्याच्या ८५ घटना घडल्या. गेल्या वर्षी डिसेंबर अखेपर्यंत हा आकडा १०५च्या आसपास होता.

म्हणजेच दर तीन दिवसांनी मुंबई विभागात रूळ तुटण्याच्या घटना घडतात. या घटनांपैकी काही घटना अत्यंत छोटय़ा स्वरूपाच्या असल्याने त्या धोकादायक नाहीत. पण अनेक ठिकाणी रेल्वेला तातडीने सुरक्षित मार्ग बनवावा लागत आहे.

हवामानातील बदल आणि स्थानिक घटकांमुळेही रूळाला तडे गेले आहेत. मात्र हे बिघाड तातडीने निदर्शनास आणून देणारे गँगमन किंवा की-मन यांमुळे मध्य रेल्वेवरील गाडय़ा सुरक्षित चालतात. त्यांची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.
– ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

Story img Loader